छत्रपती संभाजीनगर : चेलीपुऱ्यातील महावीर घरसंसार मॉलला रविवारी लागलेली आग १५ तासांनी आटोक्यात आली. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कूलिंग प्रक्रिया सुरू असल्याने मनपा, पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करता आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मॉल पूर्णत: खाक होऊन करोडोंचे नुकसान झाले.
सुमित पारख यांचे चेलीपुरा परिसरात महावीर घरसंसार नावाचे मोठे दालन होते. रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मॉलमधून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे स्वरूप एवढे मोठे होते की जवळील पाच, सहा दुकानांनाही आगीने विळखा घातला. सुरुवातीला अग्निशमन विभागाच्या दोन बंबांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच मंत्री अतुल सावे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
७० जवानांचे १५ तास शर्थीचे प्रयत्न- आगीने रौद्र रूप धारण केल्याने मनपा अग्निशमन विभागाच्या संपर्कानंतर बजाज कंपनी, विमानतळ व एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाने बंबासह धाव घेतली.- जवळपास ७० पेक्षा अधिक अग्निशमन जवानांनी आग शमविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.- ११ अग्निशमन बंब, ४० पेक्षा अधिक खासगी टँकरद्वारे पाण्याचा मारा करण्यात आला.
कूलिंग प्रक्रियेलाच १२ तासांपेक्षा अधिक अवधीरात्री १२ वाजता लागलेली आग सकाळी सात वाजता आटोक्यात आणण्यात यंत्रणांना यश आले; पण आतील भागात आग सौम्य स्वरूपात सुरूच होती. रात्री अंधारातदेखील आकाशामध्ये आगीचे लोळ स्पष्ट दिसत होते. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यानंतर अग्निशमन कूलिंग प्रक्रियेस सुरुवात झाली. जेसीबीने मलबा बाजूला करून त्याच्यावर पाणी मारण्यात येत होते. सायंकाळी ६ वाजता अंधारामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली.
सामानाची अक्षरशः राखरांगोळी, काहीच उरले नाहीमहावीर घरसंसार मॉल हा परिसरातील सामान्यांमध्ये नावाजलेला मॉल होता. घरात लागणारी प्रत्येक गोष्ट येथे विक्रीस उपलब्ध होती. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात साहित्याची साठवण होती. जेसीबीने मलबा काढताना एकही वस्तू शिल्लक सापडली नाही. मॉलची अक्षरशः राखरांगोळी झाली.
कारण अस्पष्ट, इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटचा अंदाज
अग्निशमन अधिकाऱ्यांच्या निदर्शनानुसार, आग लागली तेव्हा मॉलमध्ये काही व्यक्ती उपस्थित असल्याची माहिती आहे. मात्र, आगीचे नेमके कारण सांगता येणार नाही. दिवसभर आग धुमसतच असल्याने पंचनामा शक्य नव्हता. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.- रायबा पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा