छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, चार्जिंग स्टेशनच्या रूपाने व्यवसायाची नवी संधी निर्माण झाली आहे. त्यातच ‘महावितरण’नेही सेवा म्हणून दोन चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. चिकलठाणा एमआयडीसी व सूतगिरणी परिसरात व्हेईकल चार्जिंग स्टेशन सेवेत दाखल झाले आहेत.
इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग करण्यासाठी घरी ८ ते १० तास लागत असल्याने वाहनधारकांकडून चार्जिंग स्टेशनला प्राधान्य दिले जात आहे. कमी वेळेत आणि वेगाने बॅटरी चार्ज करण्यासाठी हे चार्जिंग स्टेशन उपयोगी ठरत आहेत. अनेकांनी छोटा व्यवसाय म्हणूनही खासगी चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. या स्पर्धेत आता महावितरणनेही उडी घेतली आहे. गारखेडा येथील सूतगिरणी सबस्टेशन आणि चिकलठाणा एमआयडीसीतील बेडसे सबस्टेशन या दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. याठिकाणी दुचाकी, चारचाकी ई-व्हेईकलची चार्जिंग करता येईल.
प्रतियुनिट दरही निम्मा..खासगी चार्जिंग स्टेशनच्या तुलनेत प्रति युनिट दरही निम्मा असल्याने येथे चार्जिंगसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महावितरणला आहे. खासगी चार्जिंग स्टेशनवर प्रति युनिट १८ ते २२ रुपये दर आकारला जातो, तर महावितरणने एका युनिटसाठी केवळ ८ ते १० रुपयांपर्यंत दर ठेवले आहेत. दोन्ही ठिकाणी वीज एकाच प्रकारची आहे, ग्राहकांच्या सुविधेसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.
केवळ एक तासात फुल..
घरच्या घरी वाहन चार्जिंगसाठी किमान ८ ते १० तास लागतात, तर चार्जिंग स्टेशनसाठी १८ किलोवॅटने वीजपुरवठा होतो, त्यामुळे याठिकाणी गाडीची बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी एक तास पुरेसा ठरतो. महामार्ग तसेच शहरातील रस्त्यांनी प्रवास करताना वाहनधारकांना जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे, याची माहिती देण्यासाठी इंधन कंपन्यांनी मोबाइल ॲप सुरू केले आहे. त्याच पद्धतीने महावितरणनेही ‘पॉवर अप ईव्ही’ हे ॲप उपलब्ध करून दिले आहे. घरच्या घरी चार्ज करण्यासाठी ई-व्हेईकल खरेदी करणाऱ्यांना कंपनी चार्जरही देते. घरगुती विजेचा सप्लाय हा २ किलोवॅट असल्याने चार्जिंगसाठी बराच वेळ लागतो, असे सहायक अभियंता श्याम मोरे यांनी सांगितले.