लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरण कंपनीतर्फे मागील तीन वर्षांत करण्यात आलेल्या कामांची मुंबईच्या विशेष पथकामार्फत केली जाणार असून लवकरच ही प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिंगोली जिल्ह्याचा दौरा केला होता. हिंगोलीत त्यांनी जनता दरबारही घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी येथील विविध विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांतील कामांचे प्रस्तावही त्यांना पाठविले आहेत. मात्र त्यावर अजूनही काहीच झालेले नाही. त्यासाठी जवळपास २0 कोटींचा निधी लागणार आहे. तर नियमित योजनांचा निधीही अद्याप मिळाला नाही. मात्र मंत्र्यांनी केलेल्या चौकशीच्या घोषणेची अंमलबजावणी होण्याची चिन्हे आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांवर भागिदारीत कामे करीत असल्याचा आरोप केला होता. तर या सर्व प्रकारांची चौकशी मुंबईतील पथकामार्फत करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर मागील कामांच्या निविदा, मोजमापपुस्तिका आदी बाबींची मागणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल महावितरणने पाठविले असून ही प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाभरातील कामांना या पथकांकडून थेट भेटी दिल्या जाणार आहेत. ते कधी येतील, हे मात्र अजून निश्चित नाही.
महावितरणची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:00 AM