श्यामकुमार पुरे
सिल्लोड : अजिंठ्याच्या डोंगर रांगेत असलेली महाराष्ट्रातील पहिली घटोत्कच महायान पंथीय बौद्ध लेणी पाचशे मीटर रस्ता नसल्याने अडगळीत पडली आहे. निसर्गरम्य परिसर असलेला हा वारसा पर्यटकांच्या भेटीला आतुर आहे. मात्र, राज्यशासनाच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या लेण्याची दुरवस्था झाली आहे. मूर्तींवर शेवाळ अन् धूळ साचली. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर हा वारसा नामशेष होऊ शकतो.
अजिंठा गावापासून केवळ २७ किलोमीटर अंतरावर गोळेगाव, अंभई, जंजाळामार्गे या लेणीत जाता येते. जंजाळा गावापर्यंत रस्ता आहे. मात्र, तेथून केवळ पाचशे मीटर रस्ता नाही. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या घटोत्कच लेणीचा विकास तर दूरच. या लेणीपर्यंत जाण्यासाठी केवळ पाऊलवाट आहे. ती पण जंजाळा गावच्या स्थानिक नागरिकांच्या शेतातून जाते. अभ्यासू व हौसी पर्यटकांना लेणीपर्यंत जायला शेत-शिवार, ओढे नाले पार करावे लागतात.
राज्य पर्यटन महामंडळ, केंद्रीय व राज्य पुरातत्व विभाग या लेणीची प्रसिद्धी आणि प्रचारही करत नाही. त्यामुळे ही लेणी बहुतांश पर्यटकांना माहिती होत नाही. जंजाळा गावातील जंगलात महाराष्ट्रातील महायान पंथीय लेणीतील पहिली लेणी म्हणून महत्त्व असलेली घटोत्कच लेणी पर्यटकांच्या भेटीला आतुर झाली आहे. मात्र, राज्य शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. अजिंठा डोंगर रांगेतच अजिंठा लेणी व घटोत्कच लेणी आहे. एकाच डोंगर रांगेत असून सुद्धा घटोत्कच लेणी अडगळीत पडली आहे. यावर इतिहासप्रेमींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
---
संवर्धन नसल्याने मूर्ती झाल्या खराब
घटोत्कच लेणी डोंगर कड्यात असल्याने येथे पावसाचे पाणी थेट लेणीत पाझरते. लेणीच्या बाह्य भागात असलेल्या मूर्तींवर मोठ्या प्रमाणात शेवाळ व धूळ साचून त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. घटोत्कच लेणीत सर्वात मोठी बुद्ध मूर्ती पहावयास मिळते.
---
लेणीत अंधार व जंगली श्वापदांचा वावर
लेणीत वीजपुरवठा नसल्याने कायमच अंधार असतो. त्यामुळे येथे वटवाघूळ व इतर प्राण्यांचा दिवसाही वावर असतो. त्यामुळे येथे मलमूत्राचा उग्र वास कायमच असतो. लेणीच्या पुढ्यातच जंगल असल्याने रात्री हिंस्र प्राण्यांचा वावर येथे असतो, असे स्थानिकांनी सांगितले. प्राणी येऊ नये म्हणून लेणीस काही वर्षांपूर्वी लाकडी दरवाजे बसविण्यात आले होते. मात्र, त्यांची पण उपद्रवी लोकांकडून मोडतोड करण्यात आली आहे.
----
-
घटोत्कच लेणीसारखा जागतिक वारसा शासनाने अडगळीत टाकला आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शहरात झाडांना ‘हेरीटेज’ घोषित करणाऱ्या शासनाला, घटोत्कच लेणीसारख्या ‘वर्ल्ड हेरीटेज’चा जाणीवपूर्वक विसर पडला आहे.
- विजय पगारे, इतिहास प्रेमी, अजिंठा.
--
राज्यसरकारच्या देखरेखीत आहे
अजिंठा लेणी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. तर घटोत्कच लेणी राज्यसरकार पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली येते. त्याचे संवर्धन झाले पाहिजे. तेथे पूर्वी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. आता का दुर्लक्ष झाले मला सांगता येणार नाही. ती लेणी आमच्या अंतर्गत येत नाही.
- डी. एस. दानवे, पुरातत्व अधीक्षक, अजिंठा लेणी.
240721\img-20210724-wa0274.jpg
अजिंठा डोंगररागेत असलेली जंजाळा येथील हीच ती निसर्गरम्य घटोत्कच लेणी... 2) लेणीला जायला रस्ता नाही अशा रस्त्याने जावे लागते.. 3) लेणीतील मोडतोड झालेल्या मुर्त्या ... 4) मूर्त्यावर साचलेले शेवाळ....