सिल्लोड ( औरंगाबाद ) : तालुक्यातील आमठाणा ग्रामपंचायतने बुधवारी ग्रामसभेत एक अनोखा ठराव पारित केला. गावातील नववधूस लग्नात ग्रामपंचायततर्फे माहेरची साडी म्हणून 'पैठणी' देऊन सन्मान केला जाणार आहे. तर जावयाचा देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत, कन्यादान योजना अशा विविध योजना भविष्यात आमठाणा ग्रामपंचायत राबविणार असल्याचे सरपंच कोकीलाबाई मोरे यांनी यावेळी सांगितले.
आमठाणा गावांमध्ये यावर्षीपासून नववधूस ग्रामपंचायतच्यावतीने पैठणी साडी आणि नवरदेवास शालश्रीफळ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून हा उपक्रम राबविला जाणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील कदाचीत पहिलाच उपक्रम असू शकतो. यानुसार आमठाणा येथे पंढरीनाथ मोहनाजी सोमासे यांची कन्या उज्वला व आकाश त्यांचा विवाह सोहळा १६ फेब्रुवारी रोजा दुपारी पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये आमठाणा ग्रामपंचायतच्या सरपंच कोकीळाबाई मोरे, उपसरपंच विमलबाई लोखंडे ग्रामपंचायतच्या सदस्या सोनूताई खरात, कमलबाई कदम, सिंधुबाई मोरे, रुखमनबाई मोरे, देवशाला तायडे, सीमा जाधव यांच्या हस्ते नववधूस माहेरची साडी म्हणून 'पैठणी' चा आहेर करण्यात आला. तर नवरदेवास कार्यकारी सोसायटीचे चेरमन काकासाहेब मोरे, दिलीप दानेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विवाहात पंचक्रोशीतील वऱ्हाडी मंडळी नातेवाईक हजर होते. यावेळी असा उपक्रम आपणही आपल्या गावात राबवू अशी चर्चा अनेक जण करताना दिसले.
असा उपक्रम सर्वांनी राबवावाआमठाणा ग्रामपंचायत प्रमाणे हा उपक्रम तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने पण राबवावा, असे आवाहन या ठिकाणी माजी सभापती अशोक गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दानेकर ,सचिन चौधरी बाजार समितीचे संचालक रघुनाथ मोरे ,ग्रामविकास अधिकारी बन्सीधर पडुळकर यांनी केले.