औरंगाबाद: कुळाची जमीन परत मिळावी,याकरीता तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रुपये लाचेची मागणी करून वकिल आणि मदतनिसामार्फत १ लाख रुपये लाच घेताना पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे आदर्श तहसीलदार म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सावंत यांचा गौरव झाला होता.
अॅड. कैलास सोपान लिपने पाटील (३८,रा. मित्रनगर) आणि मदतनिस बद्रीनाथ कडुबा भवर (३५, रा.भानुदासनगर)अशी अन्य आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाार यांनी पैठण तालुक्यातील पांगरा येथील १२ एकर १४ आर कुळाची जमीन खरेदी केली आहे. कुळाची ही जमीन परत मिळावी, म्हणून मूळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठण तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे दावा दाखल केला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी होते. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदार सावंत यांनी अॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत ३० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली. यानंतर आज २९ सप्टेंबर रोजी पैठण तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचला. यावेळी तहसीलदार सावंत यांनी त्यांच्या कार्यालयातच अॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्री यांच्या उपस्थितीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून एक लाख रुपये घेतले. लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केली. पोलीस नाईक बाळासाहेब राठोड, गोपाल बरंडवाल, रविंद्र अंबेकर आणि संदीप आव्हाळे यांनी त्यांना मदत केली.
आदर्श तहसीलदार म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता गौरवमहेश सावंत हे महसूल प्रशासनातील आदर्श व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आदर्श तहसीलदार म्हणून नुकताच गौरव झाला होता. आज त्यांना लाच घेताना पकडण्यातआल्यान ेमहसूल विभागात खळबळ उडाली.