औरंगाबाद : ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा महेमूद दरवाजा मोडकळीस आला असून, महिनाभरापूर्वी महापालिकेने दरवाजातून वाहतूक बंद केली. स्मार्ट सिटीकडून डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काम सुरू झाले नाही. पावसामुळे दरवाजाची अवस्था अधिक बिकट झाली आहे. मोठमोठे दगड कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी परिस्थिती आहे.
दोन महिन्यांपूर्वी एका मोठ्या वाहनाने दरवाजाला धडक दिली. त्यामुळे दरवाजाची कमान (आर्च) मध्यभागी वाकली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दरवाजाची पाहणी केली होती. स्मार्ट सिटीच्या निधीतून त्वरित कामाला सुरुवात करा, असे त्यांनी निर्देश दिले. महिना उलटला तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरातील इतर दरवाजांची दुरुस्ती सुरू आहे. महेमूद दरवाजासाठी स्मार्ट सिटी प्रशासन स्वतंत्र निविदा काढून डागडुजी करणार, अशी घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.