औरंगाबाद : महिला डॉक्टरच्या घरातून विविध पाकिटांतील १ लाख ८ हजार रुपयांची रोकड घेऊन मोलकरीण पसार झाल्याची घटना शहाबाजार परिसरात घडली. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाबाजार येथील मुरमुरे मशिदीजवळ राहणाऱ्या डॉ. सय्यदा अर्शिया फातेमा सय्यद महेमूद (४२) यांच्या घरात सना बानू ही महिला मोलकरीण कामाला होती. मागील वर्षभरापासून काम सना बानू ही मोलकरीण डॉ. अर्शिया यांच्याकडे कामाला होती. तिला राहण्यासाठी डॉ. अर्शिया यांनी एक खोलीदेखील दिली होती. सुरुवातीला काही दिवस ती चांगली राहिली. घरकामही व्यवस्थित करत होती. मात्र, काही दिवसांनंतर ती काही टारगट मुलांना घरात बोलून त्यांच्याशी चेष्टामस्करी करताना दिसली. त्यामुळे डॉ. सना यांना तिच्या चारित्र्याबाबत संशय आला. त्यांनी तिला खोली खाली करण्यास सांगितले. सुरुवातीला तिने टाळाटाळ केली. १४ मार्चला तिने घर रिकामे करत असताना वरच्या मजल्यावरील कपाटातील विविध पाकिटांमध्ये ठेवलेले १ लाख ८ हजारांची रोकड पळविल्याचे निदर्शनात आले. घरातील रोख रक्कम चोरल्याचा संशय सना बानू हिच्यावर आल्यामुळे डॉ. अर्शिया यांनी या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास मनगटे करत आहेत.