औरंगाबाद : शहरातील बुढ्ढीलाईन येथे दोन भावांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून एकाला जखमी करून पसार झालेला मुख्य आरोपी अक्रम खान शेर खान ( रा. हर्सूल परिसर) याला सिटी चौक पोलिसांनी सोमवारी (दि. १) मध्यरात्री अटक केली. या प्रकरणात आरोपी अक्रमचा मालक भंगार व्यावसायिक शेख महेमूद अहमद ऊर्फ राजा भाई याला घटनेच्या दुसऱ्या दिवशी २९ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती.
आरोपी अक्रम खान याने रात्री रस्त्यात गाडी का लावली, याचा जाब विचारणाऱ्या अब्दुल रज्जाक अब्दुल आणि अब्दुल जब्बार या भावंडांवर २८ जानेवारी रोजी बुढ्ढीलेन येथील भंगार दुकानासमोर गोळीबार केला होता. यात अब्दुल जब्बार गंभीर जखमी झाला होता. घटनेपासून तो फरार होता. दरम्यान, पोलीस कोठडीदरम्यान आरोपी राजाभाई याने अक्रमचे घर पोलिसांना दाखविले. अक्रमच्या घरझडतीत गुन्हा करण्यासाठी वापरलेले गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे राऊंड (गोळ्या) पोलिसांनी जप्त केली. शिवाय आरोपीची कार जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. या गुन्ह्यातील दुसरा फरार मुख्य आरोपी अक्रम खान मात्र पोलिसांना सापडत नव्हता. तो येथून सोलापूरला पळून गेला होता. तो सोलापूर येथून औरंगाबादच्या दिशेने येत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काशीनाथ मंहाडुळे, पोलीस नाईक संजय नंद, शेख गफार, रोहिदास खैरनार, पोलीस शिपाई संदीप तायडे, देशराज मोरे यांच्या पथकाने पाचोड येथे सापळा रचून अक्रम खानला पकडले.