शवविच्छेदनगृहासमोर
कचरा जाळणे थांबवा
औरंगाबाद : घाटीतील शवविच्छेदनगृहासमोर गेल्या काही दिवसांपासून कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत असल्याने मयताच्या नातेवाइकांना त्रास होत आहे. हा प्रकार थांबविण्याची मागणी नातेवाइकांतून होत आहे.
भाग्यनगरातील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
औरंगाबाद : शहरातील भाग्यनगर येथील रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे भाजप युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य कुणाल मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ये-जा करताना नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातही होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
विद्यापीठ मार्गावरील
दुभाजकाची दुरवस्था
औरंगाबाद : छावणी ते विद्यापीठ मार्गावरील दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. दुभाजकात जागोजागी झाडीझुडपी वाढली आहे. लोखंडी दुभाजक ठिकठिकाणी गायबही झाले आहे. या रस्त्यावरून पर्यटकांचीही ये-जा होते. त्यामुळे दुरवस्था दूर करून दुभाजकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी होत आहे.
पाणचक्की रस्त्यावर कचरा पडून
औरंगाबाद : पाणचक्कीपासून काही अंतरावर रस्त्यावरच कचरा फेकण्याचा प्रकार होत आहे. शिवाय हा कचरा महापालिकेकडून उचललाही जात नाही. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.