हिंगोली : शहरातील औंढा रस्त्यावर अवैध वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षावर कारवाई केल्याने फौजदार बालाजी तिप्पलवाड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आरोपी संतोष बांगर यांना १६ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.औंढा रस्त्यावर कयाधू नदीनजीक अवैध वाहतुकीविरूद्धच्या मोहिमेंतर्गत वाहनांवर कारवाई सुरू असताना एका आॅटोरिक्षाचालकाशी फौजदार बालाजी तिप्पलवाड यांची शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रकरणी आठ जणांवर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आरोपी संतोष बांगरच्या वतीने अॅड.मनीष साकळे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली. ५ हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपीस जामीन देण्यात आला आहे. अॅड.मनीष साकळे यांनी आरोपीतर्फे न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांना अॅड.अग्रवाल, अॅड. घुगे यांनी सहकार्य केले.दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश घुगे, शेख नयुम शेख अय्युब, अशोक ऊर्फ आशिष मुंढे, आशिष मुदीराज, मुरलीधर बांगर, शंकर उर्फ गुड्डू बांगर, किशोर खंदारे यांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अटक केली होती. या प्रकरणाचा तपास फौजदार विवेक सोनवणे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
मुख्य आरोपीस अटकपूर्व जामीन
By admin | Published: February 16, 2016 11:32 PM