औरंगाबाद : कथित कंत्राटी कामगारांना टाळ्या व थाळ्यांपेक्षा नोकरीत कायम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डाॅ. भालचंद्र कांगो यांनी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात केले.
डॉ. कांगो म्हणाले की, कोविड योध्द्यांना कायमस्वरूपी सामावून घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा. अतिशय तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या घाटी रुग्णालयातील कथित कंत्राटी कामगारांना हलाकीच्या परिस्थितीत काम करावे लागते, सद्यस्थितीत शासनाने सर्व खर्च आरोग्यासाठी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या कामगारांना सामावून घेणे अवघड नाही. नवीन जाहिरात काढून अननुभवी कामगारांना घेण्याऐवजी याच अनुभव असलेल्या तसेच साथरोग काळात शासनास साथ देणाऱ्या कामगारांना सामावून घेऊन त्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पावले उचलावीत.
ॲड. अभय टाकसाळ यांचेही यावेळी भाषण झाले. मेळाव्यात नंदा हिवराळे, संगीता शिरसाठ, मनीषा हिवराळे, नीता हिवराळे, अनिल सरोदे, उमेश गायकवाड, आकाश नितनवरे, यशपाल गवई या कामगारांचा सत्कार डाॅ. कांगो यांच्याहस्ते करण्यात आला.
अजय सुरडकर व अभिजित बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार, खासदार यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रास्ताविक विकास गायकवाड यांनी केले, तर आभार महेंद्र मिसाळ यांनी मानले.