पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शासनाने १ आॅगस्टपासून सर्व शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळावा यासाठी काम करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात महसूल विभागा मार्फत मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत आॅनलाईन सातबारा नोंदीचे काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये शिरूर तालुका आघाडीवर असून, तिसऱ्या क्रमाकांवर माजलगाव तालुका आहे.शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळावा म्हणून शासनाचे अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु केले होते. मात्र, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काम संथगतीने सुरू होते. जे काम झाले त्यातही अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर शासनाने एक मोहीम राबवून आॅनलाईन सातबाराचे काम पूर्ण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात हे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ५५ हजार ९०६ एवढ्या सातबारांची संख्या आहे. त्यातील १ हजार १२३ एवढ्या सातबारा बंद झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त सातबारा बीड तालुक्यात असून, त्याची संख्या ७४ हजार २४७ एवढी आहे. सर्वात कमी सातबारा वडवणी तालुक्यात असून, त्याची संख्या १५ हजार ३०३ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ४६ सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. याची टक्केवारी ९१.७० एवढी आहे. ३७ हजार ८६० एवढया सातबारा दुरुस्ती शिल्लक आहे.जिल्हाभरात १५ मे ते १५ जून कालावधीत विशेष मोहीम राबवत चावडी वाचनच्या माध्यमातून राहिलेल्या सातबारा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत २८ गावात चावडीवाचन करण्यात आले असून, उर्वरित गावात होणाऱ्या चावडी वाचन मध्ये हजर राहून सातबारा दुरूस्तीचे काम करून घ्यावे असे आवाहन माजलगावचे तहसीलदार एन. जी. झंपलवाड यांनी केले आहे.
आॅनलाईन सातबारा नोंदीत माजलगाव तृतीय
By admin | Published: May 29, 2017 12:20 AM