- सुनील घोडके
खुलताबाद: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाट पावसाळ्यात धोकादायक बनला आहे. आज सकाळी देखील नंदूरबारला जाणारी एसटी बस खुलताबादनजीक वेरूळ घाटात घसरली. मात्र, दैवबलवत्तर म्हणून बसमधील २४ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. मागील पाच दिवसात दोन बस व एक ट्रक या घाटात घसरून अपघात झाल्याची माहिती आहे.
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी जी- २० चे शिष्टमंडळ येणार म्हणून लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. डांबरीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्यात आला. परंतु, अतिप्रमाणात डांबर व केमीकल वापरल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. उन्हाळ्यात देखील हा रस्ता वाहनचालकांना त्रासदायक ठरला. मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने या गुळगुळीत रस्त्यावर वाहने चालवणे धोकादायक ठरत आहे. पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या पाच दिवसात दोन बस व एक ट्रक घसरून अपघात झाले आहेत. मागील रविवारी स्मार्ट सिटीबसही घसरून दरीत कोसळता कोसळता वाचली. त्यानंतर शुक्रवारी वेरूळ लेणीसमोर पुलाजवळ आयशर ट्रक घसरला. तर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर - नंदूरबार बस ( क्रमांक एम एच १४- बी टी २३६७) घाटातील गुळगुळीत रस्त्यावरून घसरली. बस रस्त्याच्या खाली उतरून बाजूच्या खडकामुळे थांबली. यामुळे बसमधील २४ प्रवासी बालंबाल बचावले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवास्यांनी केली आहे.
रस्त्यावर जास्त डांबर ओतल्याने अपघात वाढले डांबर जास्त प्रमाणात वापरल्याने रस्ता प्रमाणापेक्षा जास्त गुळगुळीत झाल आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्ता धोकादायक बनल्याने याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.- ॲड. कैसरोद्दीन, माजी नगराध्यक्ष ,खुलताबाद