औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी प्रशासकीय रचनेत बुधवारी मोठे फेरबदल केले. महापालिकेचे कामकाज गतीने व्हावे यासाठी त्यांनी सर्वच छोट्या-मोठ्या विभागांची कार्यपद्धती बदलली. आयुक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. काही अधिकाऱ्यांचे पंख छाटण्याचे कामही त्यांनी केले. मागील काही वर्षांपासून प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवीत त्यांना बळही देण्याचे काम केले. या फेरबदलाचे मनपातील राजकीय वर्तुळात स्वागत करण्यात आले. आयुक्तांना काम करण्यास १०० टक्के सूट आहे. त्यांनी आम्हाला फक्त रिझल्ट द्यावेत, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी वर्तविली.
मनपा आयुक्त डॉ. विनायक यांना रुजू होऊन दोन आठवडेच झाले आहेत. त्यांनी अत्यंत कमी वेळेत शहर आणि महापालिकेचा अभ्यास करून निर्णय घेण्यासही सुरुवात केली. मंगळवारी आयुक्तांनी महापौरांना विश्वासात घेऊन मोठे फेरबदल करणार असल्याचे सांगितले. महापौरांनीही त्यांना पूर्णपणे सूट असल्याचे सांगितले. आयुक्तांना निर्णय घेण्यास पूर्णपणे मोकळीक असली तरी त्यांनी रिझल्ट द्यावेत, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
आयुक्तांच्या अधिपत्याखालील विभाग- घनकचरा, स्वच्छ भारत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, १५० कोटींतील रस्त्यांची कामे, नगररचना, मालमत्ता विभाग आदी ३० विभाग स्वत:कडे ठेवले आहेत. अतिरिक्त आयुक्तांनाही केले सक्षममागील अनेक वर्षांपासून अतिरिक्त आयुक्तांना अधिकारच देण्यात आले नव्हते. श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे कामगार, भांडार, बांधकाममधील रस्ते, ड्रेनेज, इमारती, विद्युत, अतिक्रमण, अग्निशमन, आस्थापना विभाग, यांत्रिकी, अभिलेख विभाग, जनगणना विभागाची जबाबादारी देण्यात आली. नऊ वॉर्डांमधील तांत्रिक कामे शहर अभियंता पाहतील. विद्युत विभागाचे प्रमुख म्हणून उपअभियंता शेख खमर यांची नेमणूक केली. आस्थापना अधिकारी जक्कल यांची यापूर्वीच भांडार विभागात बदली केली आहे.
इतर विभाग
- ड्रेनेज योजनेत अफसर सिद्दीकी यांची परत एकदा प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून निवड केली. डी.पी. कुलकर्णी यांना मालमत्ता विभागाचे प्रमुख नेमण्यात आले.
- उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडील महसूल विभागाचा पदभार काढून त्यांना प्रशासन, एनयूएलएम आदी विभाग देण्यात आले.
- उपायुक्त वसंत निकम यांना सक्षक्त करण्यात आले. त्यांना ई-गव्हर्नन्स, क्रीडा विभाग, उद्यान, पशुसंवर्धन-प्राणिसंग्रहालय विभागप्रमुख करण्यात आले.
- विधि अधिकारी अपर्णा थेटे यांना महिला व बालकल्याण, कामगार विभाग पुन्हा बहाल करण्यात आला.
- उपअभियंता एम.बी. काझी यांना दक्षता पथक, निवडणूक, यांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.