- बापू सोळुंके
औरंगाबाद : लॉकडाऊन काळात हॉटेल बार, वाईन शॉप आणि मद्यनिर्मिती करणारे कारखाने बंद असल्याने त्याचा थेट फटका राज्य उत्पादन शुल्क विभागाला बसला. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन शुल्क विभागाचे ९६८ कोटी रुपयांचे उत्पन्न घटले.
औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीत देशी दारू तयार करणारे २ कारखाने, विदेशी मद्य निर्मितीचे ४ आणि बीअर निर्मिती करणारे ६ कारखाने आहेत. या कारखान्यांत तयार झालेले मद्य बाजारात जाण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे उत्पादन शुल्क जमा करणे कंपन्यांना बंधनकारक असते. कर भरल्याशिवाय मद्याची एकही बाटली कारखान्याबाहेर जात नाही. यासाठी प्रत्येक कारखान्यात उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी तैनात असतो.
येथील कारखान्यात तयार होणारे मद्य मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथे ६० टक्के तर उर्वरित महाराष्ट्रमध्ये ४० टक्के पाठविले जाते. मद्य विक्रीच्या करातून औरंगाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्याच्या तिजोरीत गतवर्षी ४ हजार ६१५ कोटी रुपये जमा झाले होते. विशेष म्हणजे दरवर्षी शासनाकडून महसूल वाढीचे उद्दिष्ट मिळते.यावर्षी आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तिमाहीत कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण देशभर बाजारपेठ बंद होती.
जूनपासून मुंबई, ठाणे आणि पुणे शहरात आॅनलाईन मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहकांकडून फारशी मागणी नसल्याने त्याचा थेट आर्थिक फटका उत्पादन शुल्क विभागाला बसल्याचे समोर आले. एप्रिल ते जून या तिमाहीत गतवर्षी औरंगाबाद उत्पादन शुल्क विभागाला १ हजार २४१ कोटी रुपये मिळाले होते. तर यावर्षी उत्पन्नात ७८ टक्के घट होऊन केवळ २७३ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती अधीक्षक सुधाकर कदम यांनी दिली. ते म्हणाले की आपल्या जिल्ह्यातील मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. आजही प्रमुख मेट्रो शहरातील मद्य विक्री आॅनलाईन आहे. थेट मद्य विक्री आणि बार सुरू झाल्यानंतर खप वाढेल आणि हळूहळू उत्पनात वाढ होईल.