औरंगाबाद : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील सर्व ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी व रविवारी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत गुन्हेगारांकडून शस्त्र, चोरीच्या चार मोटारसायकली व अजामिन वारंट असताना पोलिसांना गुंगारा देत असलेल्या १३ जणांना जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे, दीपक गिऱ्हे, सर्व सहायक आयुक्त यांच्या निगराणीखाली गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच १३ ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री १० वाजल्यापासून रविवारी पहाटे ३ वाजल्यापर्यंत शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविले. कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळताच अनेक गुन्हेगार भूमिगत झाले.
यासंदर्भात गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेत रेकॉर्डवरील ६५४ जबरी चोरी, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत असे गुन्हेगार, शहरातून हद्दपार केलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि ज्यांच्याविरुद्ध अजामिनपात्र गुन्हे दाखल आहेत, अशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत आशिष सुखदेव चव्हाण (रा. सिद्धार्थनगर), शेख आसिफ शेख दादामियाॅ (रा. फुलेनगर), शेख नदीम शेख कदीर (रा. बिस्मिल्ला कॉलनी), विक्की ऊर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे (रा. मुकुंदवाडी) यांच्याकडील शस्त्र जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले.
याशिवाय अजामिनपात्र वाॅरंट असताना भूमिगत झालेल्या १३ आरोपींना पकडण्यात आले. चोरीच्या चार मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या असून, हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.