रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी बहुमताचा आकडा हा काठावर आहे. अशा ग्रामपंचायतमध्ये सत्तेत येण्यासाठी आता आटाेकाट प्रयत्न केले जात आहेत. सदस्यांना बांधून ठेवण्यासाठी कोणी देवाच्या शपथा देत आहेत, तर कोणी भाऊबंदकी तर कोणी नातेवाईक असल्याची वेळोवेळी आठवण करून देत असल्याचे चित्र सध्या फुलंब्री तालुक्यात दिसत आहे.
तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. यातील ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर ५३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील १२ ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. अनेक ठिकाणी काठावर बहुमत प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या पॅनलप्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पॅनल सत्तेत आणण्यासाठी सदस्यांना बांधून ठेवण्याची डोकेदुखी त्यांच्या पाठीमागे लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. त्यात सरपंच पदाचे आरक्षण काय निघेल, याकडेही त्यांच्या नजरा लागल्या असून, आरक्षणानानुसार आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. काही सदस्य फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना मंदिरासमोर नेऊन देवाच्या शपथा दिल्या जात आहेत.
चौकट
सदस्य फुटण्याची भीती
सरपंच आपल्याच गटाचा व्हावा, याकरिता सर्वच पॅनलप्रमुख प्रयत्न करताना दिसत आहेत. विरोधी पॅनलमधील सदस्यांना काही ना काही आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने अनेक पॅनलप्रमुखांची झोप उडाली आहे. काही ग्रामपंचायतमध्ये दोन पॅनलला बहुमतासाठी अपक्षांची गरज भासणार आहे. त्यासाठी ही मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात काही अपक्षांचे नशीब फळफळण्याची शक्यता असून, अडीच अडीच वर्षांचे सरपंचपदाची ऑफर त्यांना मिळत आहे. देवाच्या दारात जाऊन शपथ घेऊन एका सदस्यांनी जर साथ सोडली तर सरपंच पदाचे चित्र बदलेल, याची प्रचिती पेनल प्रमुखांना आहे म्हणून आपल्या पेनलमधील सर्व सदस्यांना मंदिराच्या पाह्यरीवर नेऊन दुसऱ्या पॅनलकडे जाणार नाही, अशा शपथा दिल्या जात आहेत, वडोदबाजार व निधोना येथे तर अशा प्रकारे निवडणुका झालेल्या आहेत.
------------------------------------------------------------------------
चौकट
या गावांत बहुमत काठावर
तालुक्यातील बहुमत काठावर असलेल्या ग्रामपंचायतीत
वडोदबाजार, निधोना, गणोरी, निमखेडा, डोंगरगाव कवाड, वाकोद, डोंगरगाव शिव, पिंपळगाव गंगादेव, दरेगाव, शेलगाव, टाकळी कोलते, वाघोळा, मारसावळी आदींचा समावेश आहे. या ठिकाणी सरपंचपदाच्या निवडीपर्यंत पॅनल प्रमुखांमध्ये धाकधूक राहणार आहे.