फुलंब्री : ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात बहुतांश गावात बहुमताचा आकडा हा काठावर आहे. त्यामुळे सत्तेवर येण्याच्या सदस्यांना शपता दिल्या जात असल्याचे चित्र असून पॅनल प्रमुखांची झोप उडाली आहे. तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४ गावात निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका अंत्यत अटीतटीच्या झाल्या.
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून आकड्याच्या जुळवाजुळवीचा खेळ सध्या सुरू आहे. कारण अनेक ठिकाणी काठावर बहुमत असल्याने पॅनलप्रमुखांना आपले सदस्य सांभाळण्यासाठी नाकीनऊ येत आहे. यासह आपला पॅनलचा सरपंच व्हावा यासाठी काही सदस्यांची गरज असल्याने त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. जमा केलेले सदस्य आपल्याकडेच राहावे म्हणून त्यांना शपता देण्यात येत आहे. कारण एका सदस्यांने जरी साथ सोडली तर सरपंचपदावर पाणी फिरण्याची शक्यता असल्याने पॅनलप्रमुखांची झोप उडालेली आहे.
---- काठावरील ग्रामपंचायती ---
फुलंब्री तालुक्यातील बहुमत काठावर असलेल्या ग्रामपंचायतीत
वडोदबाजार, निधोना, गणोरी, निमखेडा, डोंगरगाव कवाड, वाकोद, डोंगरगाव शिव, पिंपळगाव गंगादेव, दरेगाव, शेलगाव, टाकळी कोलते, वाघोळा, मारसावळी आदीचा समावेश आहे. याठिकाणी सरपंचपदाच्या निवडीपर्यंत पॅनलप्रमुखांची धाकधूक राहणार आहे.