औरंगाबाद : केंद्र शासनाने वाढविलेल्या किमती कमी करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात रासायनिक खत उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रासायनिक व खतमंत्री सदानंदा गावडा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणीही त्यांनी केली.
जिल्ह्यात आधी दुष्काळ नंतर गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, कोरोनाचे संक्रमण अशा विविध संकटांचा सामना करत असलेल्या शेतकरी बांधवांसमोर आता पुन्हा रासायनिक खतांचे भाव वाढल्याने संकट निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव गडगडलेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्राकडून दीडपटीने झालेली खतांची भाववाढ शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हेच का अच्छे दिन असा सवाल विचारत असल्याचे खा. जलील यांनी पत्रात म्हटले आहे.