औरंगाबाद : शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे. ही जोखीम कमी केल्याखेरीज शेती आणि शेतकरी सुरक्षित होणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना कृषी क्षेत्राची मोठ्या बाजारपेठेशी प्रभावी पद्धतीने सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच शासनाने तालुकानिहाय आदर्श पद्धती निश्चित करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे मत कृषी परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञान या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू म्हणाले, हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस, गारपीट तसेच अतिउष्ण तापमान, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, अशा घटनांचे प्रमाण वाढते आहे. शिवाय मागील काही वर्षांत मराठवाड्यात पीक पद्धतीही अचानकपणे मोठ्या प्रमाणात बदलत गेली. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत गेला. म्हणून आता आदर्श पीक पद्धती तयार करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. संरक्षित शेतीस प्रोत्साहन द्यावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, शेती व्यवसायातील जोखमीचे दुष्परिणाम थेट शेतकऱ्यांना भोगावे लागतात. शेतीतील विविध प्रकारची जोखीम कमी करण्यावर भर द्यावा लागेल. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. विविध शेती औजारे भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. कृषी रसायन मृदशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी चांगल्या उत्पन्नासाठी शेतजमिनीची तसेच जमिनीच्या सामूची ओळख करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी कोरडवाहू भागात वनशेती तसेच फलोत्पादनास मोठी संधी असून अंबा, अंजीर, डाळिंब, आवळा, सीताफळ तसेच चिंच यासारख्या फळांचे उत्पन्न घेऊन त्यावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास ते शेतकऱ्यांना नक्कीच नफा मिळवून देणारे ठरतील, असे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांनी शेतीतील विविध जोखमींचे घटक कमी करण्याची गरज व्यक्त केली. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या प्रा. एच. एम. देसरडा यांनी तज्ज्ञांना आणि आयोजकांना खडे बोल सुनावले. कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होईल, असे काही तरी करा, असे देसरडा म्हणाले.
आदर्श पीक पद्धती बनवा
By admin | Published: August 11, 2016 1:21 AM