गेवराई : तालुक्यात पावसाने अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांची नासाडी झाली आहे. याबाबतच्या तक्रारी आ. लक्ष्मण पवार यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन तीन दिवसांच्या आत अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. बैठकीला प्रभारी तहसीलदार वैजिनाथ जोशी, गटविकास अधिकारी बी.डी.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी संदीप स्वामी, उद्धव घोडके, जे.डी.शाह, बँकेचे अधिकारी दादासाहेब गिरी, ब्रह्मदेव धुरंधरेसह अनेकजण उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पवार म्हणाले, महसूल मंडळातील गावागावांत जाऊन पिकांची पाहणी करावी. सर्व नोंदी करुन त्याचा अहवाल सादर करावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली. यामध्ये महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, पं.स. अधिकारी, पिक विमा समिती प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी, अशी समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. तेथे जाऊन पिकांची पाहणी करणार आहे. यामध्ये बाजरी, सोयाबीन, कापूस, मूग या पिकांची पाहणी करून ३ आॅक्टोबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे आ. लक्ष्मण पवार यांनी बैठकीत बोलताना सांगितले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)
तात्काळ पंचनामे करा
By admin | Published: October 01, 2016 12:45 AM