घाटीत झटतात अनेकांचे हात
जागतिक दिव्यांग दिन विशेष : प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक कार्यशाळेत कृत्रिम पाय, हात निर्मिती
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय तयार करण्यासाठी एक कर्मचारी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने पायाचा साचा तयार करण्यात व्यस्त, तर तयार झालेल्या कृत्रिम पायावर एक महिला कर्मचारी शेवटचा हात फिरवत होती. हे दृश्य कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या एखाद्या कारखान्यातील नव्हे, तर घाटीतील प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक कार्यशाळेतील आहे. दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी याठिकाणी अनेकांचे हात झटत आहे.
घाटीतील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाच्या कृत्रिम अवयवरोपण केंद्रात या दोन कार्यशाळा आहेत. दरवर्षी ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून पाळण्यात येतो. अपघातात अनेकांना हात, पाय अवयव गमवावे लागतात. तर विविध आजारांमुळेही अवयव कापावे लागतात. अशा दिव्यांगांना पुन्हा सक्षम करण्यासाठी कृत्रिम हात, पाय महत्त्वाची भूमिका निभावतात. घाटीतील या दोन कार्यशाळेत दिव्यांगांना आवश्यक असलेल्या रचनेनुसार हात, पाय तयार करण्यात येतात. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. मातोरी लिंगायत, प्रा. डॉ. सतीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोटिक टेक्निशियन शिवसेन राऊत, संतोष वानखेडे, प्रोस्थेटिक टेक्निशियन शिल्पा थोरात, शिरीन फातेमा आदी कर्मचारी कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
असा तयार हाेतो कृत्रिम पाय
कृत्रिम पाय तयार करण्यासाठी जेथून पाय कापलेला असतो, तेथील जागेचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने साचा तयार केला जातो. त्यानंतर पॉलिस्टर रेग्झीन, हार्डनर, कोबाल्ड ब्लू या रसायनाच्या मदतीने कृत्रिम पाय तयार होतो. यासाठी लागणारे तयार लोखंडी भाग जोडले जातात. कृत्रिम हातदेखील अशाच पद्धतीने तयार केला जातो. कार्यशाळेत जुन्या यंत्रांद्वारे सर्व कामे केली जातात. अद्ययावत यंत्रे मिळाल्याने अधिक गतीने कामे शक्य होतील.
दिव्यांग म्हणाले...
हाडातील संसर्गामुळे पाय कापावा लागला होता. परंतु, घाटीत मिळालेल्या कृत्रिम पायामुळे पुन्हा एकदा चालू शकणार आहे, असे रुमाना बेगम अजीज खान म्हणाल्या. कृत्रिम पायासाठी माप देण्यासाठी आलेले अविनाश नगरकर म्हणाले, घाटीतील या सुविधेमुळे मी पुन्हा उभा राहील, याचा आनंद वाटतो.
फोटो ओळ..
१)कृत्रिम पाय तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने साचा तयार करताना कर्मचारी.
२)तयार झालेल्या कृत्रिम पायावर शेवटचा हात फिरविताना कर्मचारी.