लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ : अवैधरित्या सावकाराने स्वत:च्या नावे केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करून ती जमीन मूळ मालकाच्या नावे करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे़ जिल्हा उपनिबंधकांनी अशा स्वरुपाचा निर्णय दिल्याने अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत़सोनपेठ तालुक्यातील करम तांडा येथील राजू राठोड यांच्या वडिलांनी २००५ मध्ये वैद्यकीय खर्चासाठी जवळच्या नातेवाईक सावकाराकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते़ त्या बदल्यात सुरक्षा म्हणून विना ताब्याचे शेतीचे खरेदीखत करून देण्यात आले़ वडिलांच्या मृत्यूनंतर राजू राठोड यांनी सदर सावकारास व्याजासह मुद्दल रक्कम परत केली व जमिनीचे खरेदीखत आपल्या नावे करण्याची विनंती केली़ मात्र त्यास सावकाराने नकार दिला़ त्यामुळे राठोड यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात या खाजगी सावकाराविरूद्ध तक्रार केली होती़ या तक्रार अर्जावरून सोनपेठ येथील सहाय्यक निबंधक आऱ एम़ कांबळे यांनी प्रकरणाची चौकशी केली़ यात राजू राठोड यांचे वडील लक्ष्मण राठोड यांनी त्यांच्या कुटुंबातील एकत्रित जमीन २००५ साली कर्जासाठी सावकाराकडे गहाण ठेवली आहे़ जमीन सावकाराच्या नावे असली तरी ती शेतकऱ्याच्या ताब्यात होती़ तसेच खरेदीखतावर सावकारीसाठी गहाण असे स्पष्ट नमूद केल्याने या प्रकरणात अवैध सावकारी असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला़ जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी या प्रकरणात सुनावणी घेऊन अवैध सावकाराचे खरेदीखत रद्द करण्याचे आदेश दिले़ तसेच सावकाराच्या नावे असलेला शेतीचा फेर मूळ शेतकऱ्याच्या नावे घेण्याचेही आदेश दिले आहेत़ त्यामुळे अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे़
जमीन मूळ मालकाच्या नावे करा
By admin | Published: June 15, 2017 11:23 PM