पैठण: पाणीटंचाई बैठकीत तहसीलदार पैठण यांना झालेली अरेरावी व कार्यालयात घुसून जि प च्या उपविभागीय अभियंत्यास मारहाण झाल्यानंतर पैठण तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संरक्षण देता येत नसेल तर आमच्या बदल्या करा व आम्हाला येथून जाऊ द्या अशा शब्दात विविध कर्मचाऱ्यांनी आपली उद्विग्नता उपविभागीय अधिकाऱ्या समोर शुक्रवारी व्यक्त केली.
शासकीय काम करत असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामाशी हितसंबंध नसलेले, गुंडगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकाकडून अरेरावी पैठण तालुक्यात वाढली आहे. प्रसंगी अधिकाऱ्यावर हात उचलण्यापर्यंत या समाजकंटकाची मजल पोहचली आहे. तहसीलदार सारंग चव्हाण हे आंतरवाली खांडी ता. पैठण येथे पाणीटंचाईची बैठक घेत असताना गावातील एकाने भरबैठकीत गोंधळ घालून चक्क तहसीलदारांना अरेरावी केली होती. ही घटना ताजी असतानाच दि ३० ऑक्टोबर रोजी जि प बांधकामचे उपविभागीय अभियंता संभाजी अस्वले हे कार्यालयात काम करत असताना एकाने त्यांना दिवाळीसाठी ५० हजार रूपयाची मागणी करीत थेट मारहाण केली.
या दोन्ही घटनामुळे तालुक्यातील शासकीय कर्मचारी उद्विग्न झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटना, तालुका तलाठी संघ, नगर परिषद कर्मचारी संघटना आदीसह पंचायत समिती, पाटबंधारे व विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांची भेट घेऊन कुठलाही हितसंबंध नसताना माहिती अधिकाराचा गैरवापर करून माहिती मागणाऱ्या कार्यकर्त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले असून बरेच कार्यकर्ते सातत्याने माहिती मागतात व प्रसंगी धमक्या देतात अशा संताप जनक भावना उपविभागीय अधिकाऱ्या समोर मांडून त्यांना निवेदन दिले.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली पोलीस प्रशासनाशी चर्चाकर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना ऐकून घेतल्यानंतर प्रशासन कर्मचाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ यांनी विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर पोलीस प्रशासनाशी चर्चा करून या बाबत योग्य दखल घेण्याच्या सूचना दिल्या.