लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे गुप्तधन काढण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी शनिवारी तोंड उघडले. गुप्तधन काढण्यासाठी त्यांना मुलीचा नरबळी द्यायचा नव्हता, तर केवळ जाधव परिवाराकडून आणखी जास्तीचे पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा बनाव केल्याचे तपासात उघड झाले.अटकेतील आरोपी बाळू गणपत शिंदे व इमामखॉ हसन पठाण या दोन्ही भोंदू मांत्रिकांना त्यांच्याकडून अगोदरच जास्त पैसे मिळाल्याने त्यांचे आणखी पैसे उकळण्याचे नियोजन होते. यासाठी त्यांनी गावातील पडलेल्या घरात दडलेले गुप्तधन शेतातील घरातून काढून देतो, असेही सांगितले होते; परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला.रांजणगाव येथे आरोपी दिगंबर कडुबा जाधव यांच्या शेतात एका मुलीची नग्नावस्थेत पूजा करून तिचा नरबळी देण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ‘अंनिस’ व प्रसार माध्यमांच्या समक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता रांजणगाव शिवारातील शेत वस्तीवरील घरात गुप्तधन काढण्यासाठी मांडलेली पूजा दिसून आली, तर बाळू शिंदे हा या ठिकाणी पूजा करण्यासाठी बसलेला होता. दोन दिवस अगोदर सदर मांत्रिकांनी जमिनीत अगोदरच दडवून ठेवलेली दीड किलो वजनाची एक पितळी मूर्ती काढून दाखवली होती.या मूर्तीच्या खाली धन असून ते काढण्यासाठी त्यांच्यात १ लाख ६८ हजार रुपयांची तडजोड झाली होती. त्यानुसार त्यांनी एक तांब्याचा हंडा काढून दाखवत त्यामध्ये सोने असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. वास्तविक पाहता हंड्यात राख व माती निघाली.दोन्ही भोंदू मांत्रिकांना त्यांच्याकडून आणखी पैसे उकळायचे असल्याने त्यांनी जमिनीत आणखी एका हंड्यात गुप्तधन असून ते काढण्यासाठी व अगोदर काढलेल्या धनाची शांती करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री एका मुलीची नग्नावस्थेत पूजा करावी लागेल व तिचा बळी द्यावा लागेल, असे जाधव यांना सांगितले होते.केवळ जाधव कुटुंबाकडून जास्तीचे पैसे उकळण्यासाठी नरबळी देण्याचा हा बनाव होता, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी सांगितले. सदरील मांत्रिकांना गुप्तधन काढण्यासाठी आणखी कोणाची मदत होती का, त्यांच्याकडून या अगोदरचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.पूजेच्या साहित्यासह एक कारही जप्तपोलिसांनी बाळू गणपत शिंदे (म्हाडा कॉलनी, औरंगाबाद) व इमामखॉ हसन पठाण (रा. करडगाव, ता. घनसावंगी जि. जालना) या दोघांना फसवणूक केली म्हणून, तर दिगंबर कडुबा जाधव (रा. रांजणगाव, ता. फुलंब्री) यास गुप्तधनाच्या लालसेपोटी अंधश्रद्धेला बळी पडून अघोरी पूजा करताना मिळून आल्याने अटक केली.त्यांच्या ताब्यातून १ हजार ५०० रुपयांची मूर्ती, ५०० रुपयांचा तांब्याचा हंडा, ८०० रुपयांची तांब्याची कळशी व १२० रुपयांचे पूजेचे साहित्य, असा २ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल व एक कार (क्र. एम एच २० बीसी ८३३०) जप्त केली आहे.
पैैसे उकळण्यासाठी केला नरबळीचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:44 AM