औरंगाबाद - गतवर्षी रेस अक्रॉस अमेरिका ही खडतर रेस अवघ्या ११ दिवसांत पूर्ण करणारे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी देशातील अव्वल आयर्नमन अॅथलिट बनण्याचे लक्ष्य बाळगले आहे. स्विमिंगविषयी भीती घालवण्यासाठीच आपण आयर्नमन होण्याचे लक्ष्य ठवले, असेही त्यांनी सांगितले.गतवर्षी जून महिन्यात जगातील सर्वांत खडतर रेस अक्रॉस अमेरिका ही ५ हजार कि.मी. अंतराची शर्यत ११ दिवस आणि २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण करणारे डॉ. अमित समर्थ औरंगाबाद येथे एका कार्यक्रमानिमित्त रविवारी दाखल झाले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, ‘‘आपण आधी धावपटू होतो आणि स्विमिंगविषयी मनात भीती होती. ही भीती काढण्यासाठी चांगला स्विमर म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण आयर्नमन होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे सायकल चालवण्याकडे वळालो. त्यानंतर २०१५ मध्ये डेक्कन क्लिफर हँगर ही पुणे ते गोवा अशी ६४० कि.मी.ची रेस पूर्ण करीत मी ‘रेस अक्रॉस अमेरिका’ या शर्यतीसाठी पात्र ठरलो. ४ डिसेंबर २०१६ मध्ये पर्थ येथे ४ कि.मी. जलतरण, १८० कि. मी सायकलिंग आणि ४२ कि.मी. रनिंग ही आयर्नमन रेस पूर्ण केली. त्यासाठी सलग सहा महिने डोंगर आणि हायवेवर सराव केला. आता या वर्षी पुन्हा पुणे ते गोवा ही ६४३ कि.मी.ची रेस आपले लक्ष्य आहे.’’१२ वेळेस अर्ध आयर्नमॅन रेस पूर्ण करण्याचा पराक्रम केलेल्या अमित समर्थ यांनी रेस अक्रॉस अमेरिका ही खडतर रेसविषयीही त्यांनी त्यांचा थरारक अनुभव कथन केला. ते म्हणाले, रेस अक्रॉस अमेरिका ही खूपच खडतर आहे. पहिल्या तीन दिवसांतच अनेक जण ही शर्यत सोडतात. कारण येथे क्षमतेचा कस लागतो. वेगवेगळे हवामान. कधी उष्ण तर कधी थंड. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि याचा आपल्यालाही त्रास जाणवला. या रेसचा मार्ग वाळवंट तसेच अनेक शिखर पार करून पूर्ण करावा लागतो. तसेच अनेक उंचच चढ आणि उतार. त्यात अनेक मोठ मोठे खडक मार्गात असतात. या दरम्यान वेस्ट व्हर्जिना येथे तर तब्बल १२ तास मुसळधार पावसाचाही सामना करावा लागला; परंतु निर्धारित वेळेत ही रेस पूर्ण करायची असल्यामुळे कोठेही थांबता येत नव्हते. आवश्यक आहारही सायकलवरच घ्यावा लागत होता. फक्त झोप, विश्रांती अथवा टायर व ट्यूब बदलण्यासाठीच सायकल थांबवता येत होती. रात्रीही गाडीच्या प्रकाशझोतात सायकल चालवावी लागे. आॅरिझोन जंगलातील प्रवास खूपच कठीण होता. पहिल्या दोन दिवसांत ९00 कि. मी. अंतर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आत्मविश्वास उंचावला. या मार्गादरम्यान अॅरिझोना डेथ झोन आहे. तेथे अनेकांनी शर्यत सोडली.’’महाराष्ट्रात सायकल संस्कृती रुजविण्यासाठी शालेय व महाविद्यालयापासून सुरुवात करायला हवी. विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात सायकलवर येण्यास सांगायला हवे. सायकल चालवणे हे तंदुरुस्तीसाठीही अनेक दृष्टीने लाभदायक आहे. दररोज किमान अर्धा तास सायकल चालवायला हवी. तसेच सायकल क्लब स्थापन व्हायला हवे.- डॉ. अमित समर्थ
अव्वल आयर्नमॅन बनायचेय, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अमित समर्थने बाळगले लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:14 AM