छत्रपती संभाजीनगर : दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या लावण्या तब्बल पाच तास उशिराने सुरू झाल्या. तोपर्यंत सृजनरंग मंचाकडे तरुणांची तोबा गर्दी झाली होती. प्रत्येकाची उत्सुकता ताणली गेलेली होती. इतर मंचावरील कार्यक्रम संपत आल्यामुळे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लावणी कलाप्रकाराला सुरुवात झाली. एकाहून एक अशा सरस ठसकेबाज लावण्यांची पेशकश अन् त्यावर थिरकणाऱ्या तरुणांचा जल्लोष..असंच काहीस चित्र युवा महोत्सवातील तिसऱ्या दिवसांच्या सायंकाळी लावणीच्या सादरीकरणामुळे दिसून आले.
लावणी कलाप्रकाराची सुरुवात योगेश्वरी महाविद्यालयाच्या कलाकाराने 'मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा' अशी आर्त हाक मंचावरून देताच सभागृह मनापासून झुलू लागले. टाळ्या, शिट्ट्यांचा गजर करीत तरुणाईने कलाकारासारखाचं नृत्याचे सादरीकरण केले. समोरचे मान डोलवून, तर मागचे ठेका धरून नाचू लागत, असे एकदा नव्हे तर वारंवार म्हणजे तब्बल दहा वेळा घडले. कोहिनूर महाविद्यालयाच्या कलाकाराने 'मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा'चा ठेका धरला. लावणीसाठी ७० संघांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ संघांनी हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत २० लावण्या सादर झाल्या होत्या. त्यामध्ये राजसा विडा रंगला ओठी, प्रीतीच्या झुल्यात झुलवा, मला जाऊद्या ना घरी, रेशमाच्या रेघांनी, कशी दिसते मी, केवड्याचं जसं बन, आदी लावण्या सादर झाल्या. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान, वाद-विवादातून काढले एकमेकांचे प्रश्न खोडूनकृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान समाजाला शाप ठरते की वरदान यावर युवा महोत्सवात मोठ्या प्रमाणात खल करण्यात आला. प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाने एकमेकांचे प्रश्न खोडून काढत दोन्ही बाजू मांडल्या. निमित्त होते वाद-विवाद स्पर्धेचे. सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्याविषयी सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे. मानवाला लागणाऱ्या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्राकडून करून घेण्यास सुरुवात झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या आडून अनेकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या जातील. चुकीच्या पद्धतीने सर्व यंत्रणा राबविण्यात येईल. त्यामुळे हे तंत्रज्ञान मानव समाजाला विनाशाकडे घेऊन जाणारे ठरेल, अशी एक बाजू काही विद्यार्थ्यांनी मांडली. समर्थनात अनेकांनी तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे मानवाचे जीवन कसे सुसह्य बनले आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाने मानवाच्या विकासात हातभार लावला असल्याचे स्पष्ट केले.