परभणी : मोकळ्या जागेत साचलेल्या घाण पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होऊन या डासांच्या चावण्यामुळे मलेरिया होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. याकरीता आठवड्यातून एकदा घरातील सर्व भांडी साफ करुन नागरिकांनी कोरडा दिवस पाळल्यास डासांचा प्रादुर्भाव टळू शकतो. परिणामी मलेरियाचा धोकाही कमी होण्यास मदत होऊ शकते.२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. रेनॉल्ड रॉस नावाच्या शास्त्रज्ञांनी मलेरियाच्या पॅरासाईटचा शोध लावला होता. त्यांनी मलेरियातील जंतू शोधल्याने त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात येतो. डासांच्या मादीमुळे मलेरियाचा जंतूद्वारे प्रसार होतो. आजारी अथवा सदृढ मनुष्याला या डासांच्या चाव्यामुळे मलेरिया होऊ शकतो. परभणी जिल्ह्यात आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी साचलेल्या घाण पाण्यातून या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मोकळ्या जागेत, ग्रामीण भागामध्ये डबक्याचे पाणी साचल्यास त्यात जंतूची वाढ होते. यामुळे त्या जागेत डास मोठ्या प्रमाणात बसतात. असे डास चावल्यास जंतूद्वारे मलेरिया होण्याची भीती असते. योग्य उपचाराद्वारे व तपासणी पद्धतीमुळे हा आजार बरा होतो. या करीता लक्षणे आढळून आल्यास संबंधित रुग्णाने रक्ताची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)
सांडपाण्यातील डासांमुळे वाढतो मलेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2016 11:43 PM