- आनंद देशपांडे
संत ज्ञानेश्वर माऊलींनी एका रेड्याच्या तोंडून वेदमंत्र वदवून घेतले हे आपणा सर्वांना विदित आहेच (म्हणजे ‘माहीत’ आहेच, असे नवतरुण वाचकांनी वाचावे. लेखकाला आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी लेखनात असे शब्द वापरावे लागतात. त्याशिवाय इम्प्रेशन पडत नसते. असो.), तर वादाचा मुद्दा असा, की ‘माऊलींनी ज्या रेड्यामुखी वेदमंत्र वदवून घेतले तो रेडा मूळ कुठला असावा’ याविषयी प्रादेशिक वाद निर्माण झाला, तर राज्याच्या विविध भागांमधील विचारवंत आपली, आय मिन आपल्या रेड्याची बाजू कशी मांडतील? हा लेख वाचून झाल्यानंतर आपल्याही डोक्यात असंख्य मुद्दे उपस्थित होतील याविषयी आमच्या मनात संदेह (म्हणजे शंका, पुन्हा तेच) नाही. कोण म्हणतो, विनोदी लिखाण विचार-प्रवर्तक नसते म्हणून? तर अशी असतील विविध प्रदेशांमधील विचारवंत मंडळींची मते- मराठवाडा- माऊली मूळ मराठवाड्यामधील असल्यामुळे त्यांनी प्रादेशिक बुद्धिमत्तेचा अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाड्यातील रेड्याची निवड करणे साहजिक आहे. शिवाय विकास झालेला नाही
अन्यथा मराठवाड्यातील रेड्यांची कीर्ती अगदी अमेरिकादी देशांनाही कळाली असती. माऊली द्रष्टे (म्हणजे फोरसाईट असणारे) असल्यामुळे कोणतीही तक्रार न करता किंवा आढेवेढे न घेता किंवा उद्दामपणा न करता, मिळेल तो चारा खाणारा आणि सांगेल ते ऐकणारा सहिष्णू रेडा फक्त मराठवाड्यात मिळू शकेल याची त्यांना खात्री असावी. सदर रेड्याने ऐनवेळी काहीही आगाऊपणा न करता आणि माऊलींना चार लोकांपुढे तोंडघशी न पाडता वेदमंत्र म्हणून दाखविले आणि समस्त रेडेजातीची लाज राखली आणि शान वाढविली त्याअर्थी तो रेडा मराठवाड्यातीलच आहे, हे सिद्ध होते.
मराठवाडा ही संतांची भूमी असल्यामुळे येथील रेडे पण काही एक आध्यात्मिक अधिकार बाळगून असतीलच. हे काम महाराष्ट्रातील इतर भागांतील रेड्यांना कधीच शक्य होणार नाही. सबब सदर रेडा मराठवाड्यातीलच होता, अशी अधिसूचना काढून शासनाने या वादावर पडदा टाकावा, अशी मी सूचना करतो.
पुणे- ज्ञानेश्वरांनी वेद वदवून घेण्यासाठी साहित्यविषयक संवेदना बोथट असलेला रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी का निवडला असावा याचे आकलन होत नाही. शिवाय इथे महिषवर्गीय प्राणीच वापरायचा असेल, तर आपण म्हशींना डावलून समस्त स्त्रीवर्गावर अन्याय करीत आहोत याची पण जाण त्यांनी ठेवलेली दिसत नाही. अर्थात, अल्पवयीन साहित्यिकाकडून आपण काय वेगळी अपेक्षा ठेवू शकतो? असो. तरीही सदरहू रेडा हा पुणे येथीलच असावा, असा अंदाज बांधणे शक्य आहे. याचे दोन पुरावे देता येतील. पुण्यनगरी ही बुद्धिमंतांची खाण आहे. अर्थात, रेडा असो, की येरवाड्याचा वेडा, दोघांनाही मोठे होण्यासाठी पुण्यासच यावे लागते आणि त्याकाळी ज्या पंडितांना हे वेदमंत्र ऐकवायचे असतील ते पुण्यातीलच असणार. कारण तेव्हाही आणि आतासुद्धा पुण्यातील प्रत्येक दुसरी व्यक्ती ही पंडित किंवा विदुषी असते. ज्ञानेश्वरांनी त्यांना नेवासे किंवा इतरत्र बोलावले, तर ते पुणे सोडून कुठेच जाणार नाहीत. सबब त्यांनी सदाशिव पेठेच्या आसपासचा एखादा रेडा गाठून त्याच्याकडून हे काम करवून घेतले असणार. सदरचा रेडा हा पुण्याचा होता हे यावरून सिद्ध होते. शिवाय ज्ञानेश्वरांना पण माहीत नसणारे काही जास्तीचे मंत्र त्याने उच्चारले होते का याविषयी पण संशोधन झाले पाहिजे म्हणजे तो पुण्याचाच होता हे सिद्ध होईल.
विदर्भ- तो रेडा आमचाच होता हा दावा आम्ही सोडून नाही राहिलो; पण वेगळ्या विदर्भाची आमची मागणी फार जुनी असून, ती मान्य झाल्याशिवाय आमचे रेडे कोणतेच मंत्र म्हणणार नाहीत हे निश्चित. सदरील रेडा एक मंत्र झाला की लगेच ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ असे पालुपद लावीत होता काय याचा जांगडगुत्ता एकदा सोडविल्यास तो आमचा होता काय याविषयी निष्कर्ष काढता येईल.
पश्चिम महाराष्ट्र : अजिबात सिंचन-क्षमता नसणार्या मराठवाडा किंवा विदर्भातील कुपोषित रेडे काही म्हणतील हा दावाच हास्यास्पद आहे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात रेडे भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे सर्व क्षेत्रांत आहेत. कोल्हापूरजवळील राधानगरी अभयारण्यात त्यांचे मोठे भाऊ गवेपण आहेत. आमच्याकडील रेड्यांना मंत्रच काय, बासरी वाजवायला सांगितले तरी सहज वाजवतील. आमची पब्लिक अशा सर्व कलांना किती भरीव हातभार लावते हे आमच्या भागातील असंख्य कलाकेंद्रांना भेटी दिल्यास लगेच लक्षात येईल.आपल्या संसाराची राख झाली तरी चालेल; पण कलावंत उपाशी राहू नयेत, असा सेवाभाव असणार्या आमच्या भागातच अशा कलाकार रेड्याची उपज आणि जोपासना होऊ शकते. सदर रेडा आमच्या भागातील आहे हे शासनाने जाहीर केले नाही, तर गाठ आमच्याशी आहे, महाराष्ट्र पेटून उठेल आणि मुख्यमंत्री कुठलाही असला तरी राज्य आमचेच असते हे लक्षात ठेवावे.
मुंबई- इकडे लोकांना मराठी नीट बोलता येत नाही आणि तुम्ही म्हणताय रेड्याने मंत्र म्हटले. भाई वो फुकट में कुछ भी बोला होगा तो समझलो वो हमारा हैच नहीं.
कोकण- खरेतर मी कोणत्याच वादात पडत नाही. कारण त्यावेळी मी तिथे नव्हतो. रेड्याकडून मंत्र वदवून घे, बिना इंधनाची भिंत चालवून दाखव, पाठीवर पराठे भाजून दे, असले आगाऊ उद्योग कोकणी माणूस कधी करीत नाही. दूध देत नसेल तर असला रेडा बाळगून करायचे तरी काय? तो रेडा तुम्हालाच लखलाभ होवो.
( anandg47@gmail.com )