प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादऐतिहासिक औरंगाबाद शहराचा संस्थापक मलिक अंबर हा आफ्रिकन गुलाम होता. हे वाचून आपणास आश्चर्याचा धक्काच बसला असेल. मात्र, हे सत्य आहे. आफ्रिकन गुलामापासून ते भारतातील निजामशाहीच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास करणारा मलिक अंबर एवढा दूरदृष्टीचा होता की, त्याने एका खडकी खेड्यात नहरे अंबरी, पाणचक्कीसारखे मोठे प्रकल्प राबवून एक वैभवसंपन्न शहर बनविले. ते शहर म्हणजे औरंगाबाद होय. या ऐतिहासिक नगरीच्या संस्थापकाची कबर खुलताबादेत आहे. कबरीची वास्तूही भव्य बनविण्यात आली आहे. मलिक अंबर हा आफ्रिकन गुलाम होता हा दावा इतिहास संशोधक डॉ. शेख रमजान यांनी केला आहे. १७५८ मध्ये दौलताबादचा तत्कालीन किल्लेदार व औरंगाबादचा गव्हर्नर ‘शाहनवाज खान’ यांनी ‘मासिर- उल- उमरा’ हे पुस्तक लिहिले. त्याची एक प्रत शेख रमजान यांच्या हाती लागली आहे. ‘तत्कालीन सरदार’ या विषयावरील पुस्तकात त्याने मलिक अंबरविषयी विस्तृत माहिती दिली आहे. डॉ. रमजान यांनी सांगितले की, मलिक अंबर हा आफ्रिकेतील इथोपिया राज्यात जन्माला आला. त्याकाळी माणसे गुलाम म्हणून विकली जात. त्याच्या आई-वडिलाने मलिकला बगदाद येथील व्यापारी ‘काजी- उल- कजाल’ यांना विकले. त्या व्यापाऱ्याकडून ख्वाजा मीर कासीम यांनी त्या आफ्रिकन गुलामाला विकत घेतले. दोनदा विक्रीवरच हा दुर्दैवाचा फेरा थांबला नाही.मलिक अंबरच्या कबरीच्या ठिकाणी माहिती फलक नाही औरंगाबादच्या संस्थापकाची कबर खुलताबादमध्ये आहे. पुरातत्व विभागाकडे या ऐतिहासिक वास्तूची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र, येथे पर्यटकांच्या माहितीसाठी कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. तेथे मलिक अंबरच्या जीवनकार्याविषयीची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, पुरातत्व विभागाने असे कोणतेच फलक येथे लावले नाही. परिणामी, औरंगाबादच्या बहुतांश लोकांना या कबरीबद्दल काहीच माहिती नाही. कबर परिसरात फलक लावावे, अशी मागणी डॉ. शेख रमजान यांनी केली.
मलिक अंबर घेतोय खुलताबादेत चिरनिद्रा
By admin | Published: August 03, 2014 1:01 AM