- राम शिनगारे
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. विभागातील एकूण पाच जिल्ह्यांतील नापास झालेल्या १९ हजार ३५९ विद्यार्थ्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. बारावी परीक्षेच्या काळात जिल्हाधिकारी, सीईओ आणि माध्यमिक शिक्षण विभागातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्याचा परिणाम विभागाच्या निकालावर झाला आल्याची माहिती शिक्षण आणि विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या निकालात औरंगाबाद विभाग नवव्या स्थानावर राहिला. याविषयी विभागीय मंडळ, माध्यमिक शिक्षण विभागाशी संवाद साधला असता, विभागांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, परभणी आणि बीड जिल्ह्यांत कॉपी रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता. काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. याचा परिणाम विभागाच्या निकालावर दिसून येत आहे. विभागात एकूण १ लाख ६३ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १९ हजार ३५९ विद्यार्थी नापास झाले आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ३६३ विद्यार्थी नापास झाले आहेत. बीड जिल्ह्यात ४ हजार ३४२, परभणी ३ हजार ५०४, जालना २ हजार ७४३ आणि हिंगोलीतील १४०७ विद्यार्थी नापास झाले. औरंगाबाद जिल्ह्यात ६० हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. याचवेळी कॉपीमुक्त अभियानामुळे अधिक प्रमाणात विद्यार्थी नापास झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२६ विषयांचा १०० टक्के निकालराज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमाला एकूण १५४ विषयांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यातील २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात मल्याळम, पंजाबी, तेलगू, पर्यावरण शिक्षण, ड्रॉइंगसह इतर विषयांचा समावेश आहे. मातृभाषा असलेल्या मराठी विषयाचा निकाल ९७.७३ टक्के एवढा लागला आहे. या विषयाची परीक्षा दिलेल्या राज्यातील ८ लाख ३५ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ९७८ विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी साहित्य या विषयाचा निकाल ९२.८३ टक्के एवढा लागला आहे.
३९५ कॉपी प्रकरणे परीक्षा काळात उघडकीसऔरंगाबाद विभागात बारावीच्या परीक्षेच्या काळात कॉपीची एकूण ३९५ प्रकरणे उघडकीस आली होती. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील ११३ प्रकरणांची सुनावणी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केली आहे. उर्वरित प्रकरणांत चौकशी सुरू असल्याची माहिती मंडळाच्या सचिव सुगाता पुन्ने यांनी दिली, तसेच गैरप्रकार झालेल्या १० पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही समजते.
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाबारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यात येऊ नये, यासाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीपासूनच माध्यमिक शिक्षण विभागाने जनजागृती मोहीम राबवली होती. परीक्षेच्या काळात जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ यांनी प्रत्यक्ष कॉपीमुक्त अभियानात सहभागी होत जिल्ह्यातील महसूल आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली. याचा परिणाम निकालावर झाला असू शकतो. मात्र, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असून, गुणवत्तेशिवाय भविष्य नसल्याचे यातून स्पष्ट झाले. - डॉ. बी.बी. चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी