औरंगाबाद : लॉकडाऊनच्या पर्वानंतर आता अनलॉकचे एकेक सत्र सुरू होत आहे आणि अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर येत आहे. याच अनुषंगाने आता दि. ५ आॅगस्टपासून शहरातील मॉल ‘अनलॉक’ होत आहेत. मॉल सुरू होत असले तरी शासनाच्या सर्वच नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे मॉल व्यवस्थापकांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
शहरातील एका मॉलची एका महिन्यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. हे सर्वच अर्थचक्र चार महिन्यांपासून ठप्प होते. याला आता पुन्हा चालना मिळणार असल्याने मॉल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील सर्व मोठ्या मॉलमध्ये एकत्रितपणे अंदाजे तीन ते चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी चार महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा कामावर रुजू होणार आहेत.
प्रत्येक व्यक्तीचे चेकअप करून नंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रत्येकाला मास्क अनिवार्य असेल. प्रत्येक वस्तूला स्पर्श करून पाहण्याची सवय आणि कोणतीही खरेदी न करता विनाकारण मॉलमध्ये फेरफटका मारण्याची सवय आता ग्राहकांना सोडून द्यावी लागणार आहे. कारण गर्दी नियंत्रित करण्यासाठी व कर्मचारी, तसेच मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या सुरक्षेसाठी मॉल व्यवस्थापकांना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागेज. प्रोझोनचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आकाश जोशी म्हणाले की, आता मॉलमध्येही अपॉइंटमेंट पद्धत सुरू केली जाईल. अपॉइंटमेंट, आरोग्यसेतू अॅप असल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सॅनिटायझेशनसाठी स्वच्छता कर्मचारी वाढणारपार्किंगपासून ते विविध दालनांपर्यंत अनेक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था असणार आहे. मॉलमधील कर्मचाऱ्यांनाही पीपीई कीट परिधान करण्याची सूचना देण्यात आली असून, त्यांची दररोज तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे स्वच्छतेला अधिक महत्त्व आल्यामुळे मॉलचे वारंवार सॅनिटायझेशन करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.