गल्ले बोरगाव : समोरून येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. खुलताबाद तालुक्यातील पळसवाडीत गुरुवारी सकाळी अकराला झालेल्या या अपघातात भगवान कुशीनाथ गायकवाड (३४, रा.मुंगसापूर, ता. कन्नड) हे ठार झाले असून, साईनाथ गौतम पटाईत (३०, रा.निमगाव, ता.वैजापूर) हे जखमी झाले. मयत आणि जखमी हे दोघे मामा-भाचे आहेत. या भागात महामार्गावरील रस्त्याचे काम चालू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे सातत्याने अपघात होत आहेत.
पळसवाडी भागातून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग जात असून, त्याचे काम सुरू आहे. मुंगसापूर येथील रहिवासी भगवान गायकवाड हे भाचा साईनाथ पटाईतसोबत गुरुवारी दुचाकीने (एम.एच १७ बी.पी. ३५१९) औरंगाबादहून कन्नडकडे येत होते. तर कन्नडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना पळसवाडीजवळ जोरदार धडक दिल्याने यात भगवान गायकवाड हे ठार तर साईनाथ पटाईत जखमी झाले. या भीषण अपघातात गायकवाड यांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पं.स. सदस्य युवराज ठेंगडे, बाबूराव जाधव, अभिजीत गायकवाड, शांताराम सोनवणे, शरद दळवी यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. मयत भगवान गायकवाड यांचे शवविच्छेदन वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. या अपघाताची नोंद खुलताबाद पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बिटजमादार मनोहर पुंगळे, वाल्मीक कांबळे तपास करीत आहेत.
---- फोटो : याच दुचाकीने भगवान गायकवाड, साईनाथ पटाईत हे मामा व भाचे औरंगाबादहून कन्नडला जात होते.