औरंगाबाद - सिडको एन 4 मधील गुरुसहानीनगरात घरफोडून सुमारे 22 तोळ्यांचे दागिने आणि सात हजार रुपये चोरट्यांनी पळविले आहेत. ही चोरी रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली आहे.
वाळूज एम आय डी सी तील एका कंपनी व्यवस्थापक असलेले शिवराम दास हे सिडको एन 4 मधील गुरुसहानीनगरात शिक्षिका पत्नी आणि मुलासह राहतात. 25 ऑगस्ट रोजी रात्री दास दाम्पत्य मुलासह ओरिसातील मूळ गावी कार्यक्रमासाठी गेले होते. गावी जाताना त्यांनी घराचे मुख्य दाराला कुलूप लावली आणि बाहेरुन पडदा ओढून घेतला होता. तसेच गेटला कुलूप लावले होते. त्यांचे बंद घर चोरट्यांनी पाहिले आणि दार तोडून आत प्रवेश केला.
बेडरूममधील कपाट उघडून रोख सात हजार रुपये आणि सोन्याचे सुमारे 22 तोळ्यांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. आज रविवारी सकाळी दास दाम्पत्य गावाहून औरंगाबादला परतले तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांना समजले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला पाचारण केले.