लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अविवाहित मुलीच्या तुटपुंज्या पगारातून आजारी पती-पत्नीचा औषधोपचार आणि घरखर्च भागविणे अशक्य... त्यात मुलीचा विवाह कसा करावा, या चिंतेने वैफल्यग्रस्त वृद्धाने आत्महत्येसाठी रेल्वेरुळावर देह टाकला खरा; परंतु सतर्क नागरिकांनी धाव घेऊन त्यांचे प्राण वाचविले. हा प्रकार गुरुवारी सकाळी ११ वाजता संग्रामनगरनजीक रेल्वेपटरीवर घडला.सुभाष गणेश पटेल (चौहान) (५५, रा. बन्सीलालनगर) असे त्यांचे नाव आहे. पटेल बन्सीलालनगरात किरायाने राहतात. त्यांना विवाहित मुलगा असून, तो खाजगी नोकरीनिमित्त गुजरातेत राहतो. त्यांची अविवाहित मुलगी औरंगाबादेत खाजगी रुग्णालयात नोकरी करते. पत्नी अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळून आहे. पटेल यांनाही मधुमेह असून, ते बेरोजगार आहेत. १९८० साली ते राजकोट येथून औरंगाबादेत आले. एका व्यापाºयाकडे त्यांनी नोकरी केली. सतत आजारी पडत असल्याने त्यांची नोकरी गेली. मुलाला अत्यल्प वेतन मिळते. पत्नीला अर्धांगवायूसह हृदयविकाराचा त्रास असून, नुकतेच गँगरीनही झाले. मुलीच्या वेतनातून उपचाराचा खर्च, घरभाडे आणि दोन वेळच्या जेवणाचा खर्च कसाबसा भागतो.काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीचा साखरपुडा केला. तेव्हापासून तिच्या लग्नाच्या खर्चाची चिंता त्यांना सतावते आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ते थेट संग्रामनगरातील रेल्वेपटरीवर जाऊन झोपले. ही वेळ नरसापूर-नगरसोल गाडीची होती. ही गाडी येण्याच्या काही मिनिटे आधीच संजू गायकवाड यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पळत जाऊन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत गोर्डे पाटील यांना माहिती दिली. गोर्डे पाटील, शिवानंद वाडकर, सतीश लिंभोरे, स्वराज गोर्डे, विलास सोनवणे यांनी तात्काळ रेल्वेपटरीवर जाऊन पटेल यांना उचलून बाजूला नेले.माझा जगून काहीच उपयोग नाही, मला मरायचे आहे, असे म्हणून ते ढसा ढसा रडत होते.
रुळावर झोपलेल्या वृद्धाला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:15 AM