औरंगाबाद : मिटमिटा येथील दंगलप्रकरणी पोलिसांनी मास्टर मार्इंडचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे या भागातील राजकीय मंडळींच्या पायाखालची वाळू घसरण्यास सुरुवात झाली आहे. दंगलीचे षड्यंत्र महापालिका अधिकाऱ्यांनीच रचल्याचा आरोप करून एका लोकप्रतिनिधीने महापालिका सर्वसाधारण सभेत पुरावे सादर केले.
काही छायाचित्र महापौरांना देत मनपा कर्मचा-यानेच कच-याचे वाहन जाळल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले. मिटमिटा येथील नागरिकांवर दाखल केलेले कलम ३०७ चे गुन्हे परत घ्यावेत, असा ठरावही मंजूर करण्यात आला.
महापालिका सर्वसाधारण सभेत कचरा प्रश्नावर चर्चा सुरू असताना या भागातील नगरसेवकांनी मनपा अधिका-यांवर खळबळजनक आरोप केले. त्यामुळे एमआयएम व काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेऊन अधिका-यांवर असे बिनबुडाचे आरोप करण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली.