लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सकाळी तीसगाव चौफुलीवर शिताफीने जेरबंद केले असून, या आरोपीच्या ताब्यातून १४ लाख रुपये किमतीचे दुर्मिळ जातीचे दोन मांडूळ साप जप्त करण्यात आले.याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज एमआयडीसी परिसरातील तीसगाव चौफुलीवर एक जण मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना दिली होती. ही माहिती मिळताच डीबी शाखेचे फौजदार अमोल देशमुख, पोहेकॉ. वसंत शेळके, कारभारी देवरे, पोना. प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, पोकॉ. मनमोहन कोलिमी, संतोष जाधव, बंडू गोरे आदींच्या पथकाने सोमवारी सकाळी तीसगाव चौफुलीवर सापळा लावला होता. गुप्त बातमीदाराने वर्णन केलेला संशयित तरुण दिसताच आरोपीच्या पाळतीवर असलेल्या पथकाने छापा मारून सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास संशयित तरुणास शिताफीने ताब्यात घेतले. या संशयित तरुणाकडे असलेल्या पांढ-या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली असता या पिशवीत पोलिसांना दुर्मिळ मांडूळ जातीचे साप दिसून आले. या संशयित तरुणास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रकाश दामोधर खडसे (३०, रा. बेलोरा, ता.जि.हिंगोली) असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आपण रांजणगाव शेणपुंजी येथील आसाराम बापूनगरात वास्तव्यास असून, वाळूज एमआयडीसीतील कारखान्यात कंत्राटी कामगार पुरवीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आपल्याकडे असलेले दुर्मिळ मांडूळ साप विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची कबुली आरोपी प्रकाश खडसे याने पोलिसांना दिली.दुर्मिळ जातीचे मांडूळ जप्तआरोपी प्रकाश खडसे याच्याकडे दोन दुर्मिळ मांडूळ साप पोलिसांना मिळून आले. यात एक मांडूळ ३ फूट ७ इंच लांबीचे असून, दुसरे मांडूळ ४ फूट १ उंच लांबीचे आहे. या दुर्मिळ मांडूळ सापाची किंमत जवळपास १४ लाख रुपये असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. संशयित आरोपी प्रकाश खडसे याने हे मांडूळ विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची कबुली दिली असली तरी अंधश्रद्धेतून अथवा गुप्तधनाच्या लालसेने या मांडुळाची विक्री केली जात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला असून, या मांडुळाला वन विभागाच्या अधिका-यांकडे सोपविले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.पोलीस पथकाला२० हजारांचे बक्षीसदुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी करणा-या आरोपी प्रकाश खडसे यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शिताफीने अटक करून त्याच्या ताब्यातून १४ लाख रुपये किमतीचे दोन मांडूळ साप जप्त केले. एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आठवडाभरापूर्वीच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पत्रे उचकटून घरफोडी करणाºया आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला होता. या कामगिरीने खुश होऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी ४० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल आठवडाभरातच ६० हजारांचे बक्षीस एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाले असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचा-यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मांडूळ तस्कर जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:46 AM