लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शहरातील विविध रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून पहाटेच्या वेळी मॉर्निंगवॉकला निघालेल्या महिलांचे गंठण, मंगळसूत्र हिसकावित पळ काढणाऱ्या राजाभाऊ खेमराज राठोड (३३, रा़उजनी तांडा, ता़औसा) याने सामाजिक व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा वाढीसाठी दानशूरपणाची अफलातून शक्कल लढविली. त्याने गावातील जिल्हा परिषद शाळेला तब्बल तीन लाखाचे दान दिल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़ शिवाय, विद्यार्थ्यांना महागडे दफ्तर, शालेय साहित्यही वाटप केल्याची माहिती समोर आली आहे़औसा तालुक्यातील उजनी तांडा येथील मूळचा रहिवाशी असलेल्या राजाभाऊ राठोड याने वयाच्या १८ व्या वर्षी घर सोडले़ ३३ वर्षाचा राठोड हा अल्पशिक्षित आहे़ पुण्यात भाऊ बिल्डर असल्याने काही काळ पुण्यातही त्याने वास्तवही केले़ दरम्यान, पुण्यात सांगलीच्या चव्हाण नावाच्या तरूणाची भेट झाली आणि या भेटीतूनच मंगळसूत्र, गंठण चोरीचा सिलसिला सुरू झाला़ पुण्यामध्ये दोन वर्षे महिलांचे गंठण, मंगळसूत्र चोरण्याचे प्रशिक्षण घेतले़ यावेळी एका चोरीच्या घटनेत दुचाकी घसरली आणि चव्हाण नावाच्या साथीदाराचा पाय फ्रॅक्चर झाला़ त्यानंतर त्याने पुणे सोडून सांगली गाठले़ एकटा पडलेल्या राजाभाऊ राठोडने लातुरात आपला मुक्काम ठोकला़ लातुरात प्रारंभी विशालनगर परिसरातील साईधाम वसाहतीत वास्तव्य केल्यानंतर त्याने लातूर शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असलेल्या औसा रोडवरील विराट हनुमान येथील रूक्मिणी अपार्टमेंटमध्ये तब्बल २५ लाखांचा अलिशान फ्लॅट खरेदी केला़ चोरीतील पैशातून त्याने लाखो रुपयांचे व्यवहारही केल्याचे आता उघड झाले आहे़ विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकामध्ये क्रेडिट अकाऊंटवरून दररोज लाख, दोन लाख रुपये उचलत आणि भरत असल्याची नोंदही आढळून आली आहे़ या पैशाच्या माध्यमातून एका नामांकित फायनान्समध्ये ५ लाखाची बिसी लावल्याची माहिती पोलिसांनी दिली़ चोरलेले सोने त्या फायनान्समध्ये ठेवून त्या सोन्यावर कर्ज उचलणे आणि पुन्हा ते सोने सोडवून घेणे, असा व्यवहारही त्याने व्यावहारिक पत वाढविण्यासाठी केला आहे़ यातून एका बँकेने त्याला फ्लॅट खरेदीसाठी कर्ज रूपाने रक्कमही दिल्याचे पुढे आले आहे़
मंगळसूत्र चोरट्याने दिले शाळेला ३ लाखांचे दान !
By admin | Published: May 14, 2017 11:38 PM