छत्रपती संभाजीनगर : परिसरात आलेल्या फेरीवाल्याकडील ड्रेस परिधान करून पाहताना महिलेकडून त्यातच मंगळसूत्र ठेवले गेले. थोड्या वेळाने ही चूक लक्षात आल्यावर महिलेला धक्का बसला. जवाहरनगर ठाण्यात त्यांनी धाव घेताच पोलिसांनी विक्रेत्यांच्या फोन पे खात्यावरून माग काढत तासाभरात ती महिला विक्रेती शोधून मंगळसूत्र परत मिळवून दिले.
पृथ्वीराजनगरातील सीमा विनायक इंगळे यांच्या परिसरात सोमवारी सायंकाळी गुजरातच्या तीन कापड विक्रेत्या महिला फिरत होत्या. सीमा यांनी एक ड्रेस परिधान करून पाहत असताना गळ्यातील १ तोळे वजनाचे मंगळसूत्र काढून त्याच ड्रेसच्या खिशात ठेवले. मात्र, तो पसंत न पडल्याने परत केला. त्यानंतर विक्रेत्या निघून गेल्या. काही वेळाने सीमा यांना परत केलेल्या ड्रेसमध्येच मंगळसूत्र राहिल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ जवाहनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
निरीक्षक व्यकंटेश केंद्रे, सहायक निरीक्षक दिलीप चंदन यांनी विचारपूस केली असता सीमा यांनी दुसऱ्या ड्रेसचे पैसे त्या महिलेच्या फोन पेवर पाठवल्याचे सांगितले. चंदन यांनी त्या माेबाइल क्रमांकावर कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सायबर पोलिसांच्या मदतीने लोकेशन मिळवले असता विक्रेत्या महिला शहागंजमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. अंमलदार प्रवीण कापरे, बाळासाहेब बैरागी, सहायक फौजदार नामदेव जाधव, लंका घुगे यांनी त्यांना शोधून काढले. तो ड्रेस विकून शहर सोडण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मंगळसूत्र शोधून काढले. हे कळाल्यानंतर सीमा यांनी जवाहरनगर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.