औरंगाबाद: २० आॅगस्ट रोजी रात्री विद्यानगर येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याची मोहन माळ आणि चेन हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला पुंडलिकनगर पोलिसांनी २६ आॅगस्ट रोजी मोठ्या शिताफिने सिडको एन-३ मधील छत्रपती महाविद्यालय परिसरात पकडले. यावेळी आरोपीचा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राहुल उर्फ राणा बाजीराव सोळंके (२२)असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार बॉबी उर्फ ऋषिकेश झिजुंर्डे हा पसार आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, विद्यानगर येथील सविता नारायण कुलकर्णी या २० आॅगस्ट रोजी रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास त्या विद्यानगर येथील रस्त्याने घरी जात असताना मोटारसायकलस्वार चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याची मोहनमाळ आणि १४ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेली होती. याविषयी त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यावेळी त्यांनी चोरट्यांचे वर्णनही सांगितले होते. तेव्हापासून उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके,पोहेकॉ रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, राजेश यदमळ, नितेश जाधव, प्रवीण मुळे, शिवाजी गायकवाड, दिपक जाधव यांनी तपास सुरू केला.
तेव्हा सिडको एन-३ मधील छत्रपती महाविद्यालयाजवळ दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी तेथे धाव घेतली तेव्हा पोलिसांना पाहून बॉबी उर्फ ऋषिकेश हा पळून गेला. तर आरोपी राणा उर्फ राहुल हा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीअंती राहुलने गुन्ह्याची कबुली देत २० आॅगस्ट रोजी रात्री बॉबीच्या मदतीने विद्यानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ लुटल्याचे सांगितले.