शेंद्रा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध आशा मांगीरबाबा यात्रेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. २५ सीसीटीव्ही कॅमेरे, ११ पोलीस अधिकारी व १०० पोलीस कर्मचारी, ८ होमगार्ड असा चोख बंदोबस्त या यात्रेनिमित्त शेंद्रा येथे राहणार आहे.
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह पोलीस पथकाने रविवारी यात्रा स्थळाची पाहणी केली. उन्हाची तीव्रता असली तरी यात्राकाळात चार ते पाच लाख भाविक शेंद्रा येथे येतात. वाढत्या उन्हामुळे पाण्याची व्यवस्था व स्वयंसेवकांची नेमणूक केल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे व सचिव सुरेश नाईकवाडे यांनी दिली. परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी विहिरींचे, बोअरचे पाणी भक्तांसाठी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन सरपंच रवींद्र तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे यांनी केले.