औसा : तालुक्यातील अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मासुर्डीस गत तीन- चार वर्षांपासून पाणीटंचाई झळा सोसाव्या लागत आहेत़ ‘लोकमत’ ने मासुर्डीतील पाणीटंचाईसह अन्य समस्यांचा वेध घेत पाण्याच्या गावात दुष्काळाच्या भेगा वृत्त प्रकाशित केल्याने गावास अनेकांनी मदत केली. आता गावानेच स्वंयस्फुर्तीने दुष्काळमुक्तीचा संकल्प केला असून एक हजार झाडे लावण्याबरोबरच त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला आहे़औसा तालुक्यातील मासुर्डी गावास २०१४ पासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ त्यामुळे गावास टँकरने दररोज ४८ हजार लिटर पाणीपुरवठा होईल़ परंतु, १२ हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर अवघ्या १४ ते १६ मिनिटांत रिकामा व्हायचा़ ना जनावरांना चारा, ना पाणी अशी अवस्था झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा दावणीही रिकाम्या झाल्या़ दिवस- रात्र केवळ पाण्याचा शोध घेणे एवढेच गावातील नागरिकांचे काम बनले होते. कामाच्या शोधात अनेकांनी गाव सोडले होते.विहिरी, बोअर कोरडे पडले. या घटनांचा धांडोळा ‘लोकमत’ टीमने घेऊन सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़ त्यामुळे पुणे येथील खासदार संजय काकडे यांनी गावास भेट देऊन गाव दत्तक घेण्याची घोषणा केली़ त्यांनी गावातील नाले खोलीकरण व रुंदीकरणासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला़ त्यातून नाले खोलीकरणाचे कामही झाले. पहिल्याच पावसात या नाल्यांमध्ये पाणी साठले आहे आणि मासुर्डीच्या नागरिकांनी तीन वर्षात बघितले नाही एवढे पाणी साठल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. (वार्ताहर)
दुष्काळमुक्तीसाठी मासुर्डीत वृक्षारोपण
By admin | Published: July 08, 2016 12:24 AM