गंगापूर : मयत भावाची जमीन हडपण्यासाठी त्याच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी गंगापूर येथील दोघांविरोधात सत्र न्यायाधीश यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर येथील सर्व्हे क्रमांक २५ मधील शेतजमिनीबाबत गंगापूर येथील दिवाणी न्यायालयात रफिउल्ला खॉं फैजउल्ला खॉ व सजीउल्ल खाँ फैजुउल्ला खाँ या आरोपींनी १६ डिसेंबर २०१२ रोजी संगनमत करून आपला सख्खा भाऊ शफीउल्ला खाँ फैजुउल्ला खाँ हा मृत असतानाही त्याची जमीन हडपण्याच्या हेतूने त्यांच्याविरुद्ध दावा दाखल करून मयत भावाच्या जागी अज्ञात व्यक्तीस उभे केले. त्या अज्ञात व्यक्तीने मृत भावाची खोटी स्वाक्षरी केली व तडजोडपत्र दाखल करून तडजोड करून घेतली तसेच या पारित हुकूमनाम्याआधारे गंगापूर येथील सर्व्हे क्र. २५ येथील शेतजमिनीची सात- बारावर नोंद करून घेतली आणि भूखंड विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
मयताचे अहमदनगर येथील नातेवाईक शेख गफार अब्दुल गफार यांना सदरील प्रकरण माहीत होताच त्यांनी गंगापूर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्याची मागणी केली; परंतु न्यायालयाने ही विनंती फेटाळल्याने फिर्यादी शेख गफ्फार अब्दुल सत्तार यांनी त्याविरुद्ध वैजापूर येथील सत्र न्यायालयात अपील दाखल केले. यावर वैजापूर सत्र न्यायालयाने सुनावणी घेतली, तसेच सत्य परिस्थिती गृहीत धरून मृत व्यक्तीच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीस उभे करून गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एम. आहेर यांनी गंगापूर न्यायालयास योग्य ती कारवाई करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश ११ जानेवारी २०२३ रोजी दिले होते.
अडीच महिन्यानंतर गुन्हा दाखलन्यायालयाने ११ जानेवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना प्रत्यक्षात या प्रकरणात आरोपी रफिउल्ला खॉ फैजउल्ला खॉ व सजीउल्ल खाँ फैजुउल्ला खाँ (रा. खाजानगर, एकमिनार मस्जीदजवळ, गंगापूर) यांच्या विरोधात शेख गफार अब्दुल गफार यांच्या फिर्यादीवरून ४ एप्रिल रोजी फसवणुकीसह इतर विविध १० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात बनावट व्यक्ती म्हणून उभा राहणाऱ्या आरोपींचा पोलिस कसून शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार काथार करीत आहेत.