छत्रपती संभाजीनगर : आमच्याकडे सहज काम मिळत नाही. मिळाले तरी पंधरा दिवसाला १२०० रुपये मिळतात. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नाही. परिणामी, अनेकजण आम्हाला इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून दुसऱ्या राज्यात नेतात. त्यानंतर आम्हाला पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीत ढकलले जाते, अशी धक्कादायक कबुली सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या पीडितांनी सांगितली. मंगळवारी पोलिसांनी स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेट उघडकीस आणल्यानंतर परराज्यातील ८ तर स्थानिक ५ मुली आढळून आल्या. त्यांची शासकीय आधारगृहात रवानगी करण्यात आली.
पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांच्या सूचनेवरून सातारा व पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी एन-३ मधील रॉयल ओक स्पा व मोंढा नाका येथील अथर्व स्पा सेंटरवर छापा टाकला. तेव्हा स्पाच्या नावाखाली येथे सेक्स रॅकेट सुरू असल्याचे निदर्शनास आले. आत आलिशान खोल्या, बाथटबसह गर्भनिरोधक साहित्य, जवळपास २ लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. नवी मुंबईच्या वाशीमध्ये राहणारा भीमसिंग कबीर नाईक हा दोन्ही स्पाचा मालक आहे. स्पाचे स्थानिक व्यवस्थापन सांभाळणाऱ्या अनिल कल्याण राठोड (२६, रा. बालानगर, पैठण), पवनकुमार धनजीभाई वंसोला (२९, रा. गुजरात) व पूजा रघुनाथ खरात (२३, रा. क्रांतीचौक) यांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.
या रॅकेटमध्ये मणिपूरच्या ५, तर उत्तरप्रदेश, दिल्ली, मुंबई जालना तर शहरातील हर्सूल सावंगी, देवळाई, कैलासनगर, क्रांतीचौकातील प्रत्येकी एक मुलगी आढळून आली. दरम्यान, आरोपींना न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. निरीक्षक राजेश यादव याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर भीतीपोलिसांनी छाप्यात पकडल्यानंतर पीडितांच्या चेहऱ्यावर भीती व डोळ्यात अश्रू होते. उत्तरप्रदेश, मणिपूरमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल इतकेदेखील उत्पन्न मिळत नाही. तेव्हा काही स्थानिकांच्या नेटवर्कमधून आम्हाला आधी इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून दुसऱ्या राज्यात नेले जाते. काही दिवसांनी अधिक उत्पन्नाचे आमिष दाखवून, कधी धमकावून देहविक्रीत ढकलले जाते. चांगल्या नोकरीच्या ठिकाणी पैसेदेखील वेळेत देत नसल्याची आपबीती पीडितांनी सांगितली. काही दिवसांपूर्वीच पुंडलिकनगरमधील दोन मुलींनी हॉटेल मालकाने पगार थकवल्याने पोलिसांकडे धाव घेतली होती.