छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधींचा घोटाळा करून कारागृहात गेलेल्या अंबादास मानकापे व त्याच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०२२-२३ या अवघ्या एका वर्षात त्याने ४८ कोटी ८५ लाख ७२ हजार रुपये हडपले. यात २०१७ ते २०२१ दरम्यान लेखापरीक्षण सुरू आहे. त्या अहवालानंतर हा घोटाळा १०० कोटींच्या वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात मानकापे कुटुंबावर याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२ कोटींच्या घोटाळ्यात अंबादास, मुलगा सुनील, सून सुनंदा व वनितासह १३ आरोपी अद्यापही न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत. अनिल मानकापे मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, याच दरम्यान मानकापेच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले. आरबीआयने बँकेवर निर्बंध लादून स्वतंत्र लेखापरीक्षणानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनिल भोमावत यांनी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च, २०२३ दरम्यानचे बँकेच्या मुख्य शाखेचे लेखापरीक्षण केले. उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंढे यांनी गुन्हा दाखल केला. तर, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार अधिक तपास करत आहेत.
स्वत:च्या संस्थेच्या नावे कर्ज, रक्कम गेली कुठे ?मानकापे पहिल्या टप्प्यात ओम कन्स्ट्रक्शन, आदर्श बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, आदर्श ऑइल मिल, समर्थ इंटरप्रायजेस, आदर्श डेअरी प्रोडक्टसच्या नावे लाखोंचे विनातारण कर्ज उचलले. त्यासाठी ना कागदपत्रांची पूर्तता केली ना पुढे कर्जाची परतफेड केली.
वैयक्तिकही कोट्यवधी लाटलेमानकापेने कुटुंबासह जवळच्यांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटली. पत्नीच्या नावे दीड कोटी, द्रोपदी डांगे २ कोटी, अनिल मानकापे २ कोटी, कैलास जाधव २ कोटी, आरती पळसकर १५ लाख, समर्थनगर इंटरप्रायजेस ५ कोटी ७९ लाख, आदर्श ऑइल मिल ४ कोटी ३५ लाख, भागुबाई नारायण कुटे १ कोटी ९० लाख, आदर्श ऑटो सर्व्हिस ४ कोटी ३२ लाखांचे वाटप केले. डेअरीच्या नावे घेतलेल्या ५ कोटींच्या कर्जाची रक्कम जिल्हा महिला महिला पतसंस्था, साईरत्न निधी, पूर्णवादी सहकारी बँकेद्वारे काढली गेली.
गरीब महिलांना संचालक बनविले२०२० मध्येच मानकापेला त्याच्या कृत्यांमुळे अडकले जाणार असल्याचे कळाले होते. तेव्हाच त्याने सून व अन्य नातेवाइकांना संचालक मंडळावरून वगळून ओळखीतल्या महिलांना संचालक बनविले. घोटाळ्यात मानकापे, त्याचे मुले, सह व्यवस्थापक नामदेव कचकुरेंचर प्रमुख होते. त्यांना पुन्हा पोलिस कोठडीसाठी ताब्यात घेऊन नव्याने चौकशी होईल, असे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.