छ. संभाजीनगर - मराठाआरक्षणासाठी जालनातील अंतरवाली सराटी इथून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावात जय्यत तयारी सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. जरांगे पाटलांच्या या उपोषणाला समाजाची मोठी साथ मिळाली. त्यातूनच पुन्हा एकदा मराठा आंदोलन राज्यभरात उभे राहिले. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी १० दिवसीय दौरा करत मराठा समाजाला १४ ऑक्टोबरच्या सभेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे, मोठ्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी येत आहेत. त्यामुळे, सभेसाठी चारचाकी वाहनातून येणाऱ्या समाज बांधवांसाठी मॅकेनिक मंडळींनी मोफत सेवा पुरवण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले होते. या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरा काढला. ठिकठिकाणी जरांग पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. त्यात १४ ऑक्टोबरला होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून, युद्धपातळीवर सभेच्या ठिकाणी कामे सुरू आहेत. सभास्थळी १० फूट उंच स्टेज उभारण्यात येणार आहे. बीडमधून अंतरवाली सराटी इथं ५० जेसीबी पोहचले आहेत. जरांगेच्या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा निश्चित होती. परंतु एवढी जागा अपुरी पडेल या दृष्टिकोनातून परिसरातील आणखी जागा साफ करण्यासाठी बीड जिल्ह्यातून पन्नास जेसीबी मागवण्यात आले. मराठा समाज बांधव लोक वर्गणी आणि सहभाग घेत सभेसाठी आपले योगदान देत आहेत. तसेच, बीडमधील मॅकेनिक संघटनांनीही महत्वाचा निर्णय घेतला आहे.
बीडच्या बॉर्डरपासून ते अंतरवाली सराटीपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जाणाऱ्या-येणाऱ्या कुठल्याही गाडीला बिघाड झाल्यास किंवा गाडी मध्येच बंद पडल्यास, त्या गाडीची सेवा मोफत करुन दिली जाणार आहे. सभेसाठी येणाऱ्या चारचाकी वाहनांची मोफत दुरूस्ती करुन दिली जाणार असून बीड जिल्ह्याच्या जालना नगर येथील मॅकेनिक बंधूंनी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातून सभेसाठी येणाऱ्या सर्वच मराठा समाज बांधवांना ही सेवा पुरवली जाईल. समाजबांधव रस्त्यावर अडकून राहू नये म्हणून बीड ते अंतरवाली सराटी या मार्गावर बीडमधील मॅकेनिकच्या गाड्या पेट्रोलिंग करणार आहेत. त्यामध्ये, ४ फिटरही सोबत असणार आहेत. ते मॅकॅनिक बंद गाडी संबंधित प्रवाशांच्या घरापर्यंत सुखरुप पोहोचवण्यासाठी मदत करणार आहेत, असे येथील मॅकेनिकांनी सांगितले.