छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सतत दौऱ्यावर आहेत. उन्हातान्हाची परवा न करता केलेल्या दौऱ्यामुळे त्यांची प्रकृती आज अचानक खालावली. यामुळे त्यांना आज दुपारी छत्रपती संभाजी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून सतत राज्यात आणि राज्यात बाहेर संवाद मिळावे घेत आहेत. सततचा प्रवास आणि वाढत्या उन्हाची तमा न बाळगता जरांगे पाटील हे समाज बांधवांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असतात. दोन दिवसांपूर्वी ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. येथे दोन तीन ठिकाणी समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन ते अंतरवाली सराटीला परतले होते.
यानंतर त्यांनी नारायण गड येथे नियोजित आठ जूनच्या सभेची तयारी आढावा घेतला होता. तीव्र पाण्याची टंचाई आणि वाढते तापमान यामुळे या सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांची हाल होतील ही बाब लक्षात घेऊन त्यांनी ८ जूनची सभा पुढे ढकलण्याचे संयोजकांना सांगितले आणि ते परत अंतरवाली सराटीला परतले.
दरम्यान, आज दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अशक्तपणा, ताप आणि अंगदुखीचा त्रास असल्याचे पाटील यांनी डॉक्टरांना सांगितले. त्यांची तपासणी करून त्यांना रुग्णालयात भरती करून घेतले. जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाला असून शरीरातील साखरेचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाटील यांना आराम आणि पुढील काही दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.