छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पटोले यांना राज्यात कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे, आंदोलनामागे शिंदेचा हात आहे का म्हणून, जरांगे यांनी माझ्या आवाहनाला मान दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे असून, त्यांनी पोलिस लाठीमारप्रकरणी माफी मागितली. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. आंदोलक ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. जरांगे यांची मागणी काय आहे, जुन्या निजामकालीन दस्तांमध्ये कुणबी नोंद असेल तर व त्यात बदल असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. खरंच कुणबी नोंद असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींना आक्षेप नाही. सरसकट आरक्षण देण्यास ओबीसींचा विराेध आहे. त्यामुळे अशी कोणतीही भूमिका, राज्याची नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही. एका महिन्याचा शब्द पाळणार काय, यावर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत.
काय दावा केला नाना पाटोले यांनीजालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होते. ३१ तारखेच्या मध्यरात्रीच आंदोलक संतप्त झाले. मात्र १ तारखेला तीन वाजता सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. याच दिवशी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. या बैठकीवरुन लक्ष वळवण्यासाठीच लाठीचार्जची घटना घडवली गेली.इंडिया आघाडीवरील बैठकीचे लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवले. इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्याचे काम भाजप आणि येड्याच्या (EDA) सरकारने केले आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले.