छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे. मेळाव्याची तयारी करण्यासाठी जरांगे यांनी रुग्णालयातच बैठकांचे सत्र सुरू केले आहे.आज मंगळवारी दुपारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठका घेतल्या.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वर्षभरात सहा उपोषण केल्यानंतरही मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी शासनाने पूर्ण केली नाही. एवढेच नव्हे तर आंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले गंभीर स्वरुपाची गुन्हे अद्याप परत घेतले नाही. यामुळे मराठा समाज राज्यसरकारविरोधात आक्रोश व्यक्त करीत आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे नारायणगड येथे १२ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेत आहे. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र आणून मराठा समाजाचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे जरांगे यांनी ठरविले आहे. नऊ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यामुळे चार दिवसांपासून ते शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डाॅक्टरांनी त्यांना आणखी आठ ते दहा दिवस आराम करण्याचा आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.असे असताना जरांगे यांनी मंगळवारी रुग्णालयाच्या पार्किंग हॉल मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मराठा सेवकांच्या स्वतंत्र दोन बैठका घेतल्या. हा मेळावा सर्व समाजाचा आणि अराजकीय आहे. प्रत्येक गावांतून जास्तीत जास्त समाजबांधवांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन त्यांनी केले.
समाजाची एकजूट दाखविण्याची योग्य संधी बैठकांना मार्गदर्शन करताना जरांगे म्हणाले, नारायणगड येथे आयोजित दसरा मेळावा हा अराजकीय मेळावा आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर समाजाची एकजूट दाखविण्याची योग्य वेळी योग्य संधी मिळाली आहे. प्रत्येक गावांतून स्वतंत्र वाहनांने महिला आणि पुरूष मंडळींनी नारायणगड येथे यायचे आहे. दुपारी २ पूर्वी हा मेळावा संपून आपआपल्या घरातील सण साजरा करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.